राजुरा : मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा वीज मंडळातील बहुतांश गावात सिंचनासाठी भरदिवसा तारावरती आकोडे टाकून वीजचोरी तथा पाण्याचीही चोरी बिनधास्तपणे सुरु असल्याचे सचित्र वास्तव लोकमतमध्ये ३ डिसेंबर रोजी प्रकाशित केले होते. त्यामुळे वीज कंपनीच्या अधिकार्यासह वीज चोरांमध्ये एकच खळबळ उडाली होती. या वृत्ताची दखल घेत अनेक वीजचोरांनी आपले केबल स्वत: काढून घेत मोटरपंपाचाही गाशा गुंडाळला तर सहायक अभियंता राजेश चव्हाण यांनी स्वत: हजेरी लावून चाकातीर्थ संग्राहक व तलावावरील अवैध जोडणी असलेले जवळपास वीस केबल गुंडाळून कार्यालयात जमा केले, अशी माहिती अभियंता चव्हाण यांनी दिली.किन्हीराजा वीज मंडळातील बहुतांश भूभाग नदी-नाले व छोट्या-मोठय़ा तलावांनी व्यापलेला आहे, त्यामुळे साहजिकच या परिसरात बर्यापैकी पाणीसाठा राहतो, हा पाणीसाठा उपयोगात आणण्यासाठी विजेच्या तारावर आकोडे टाकून हजारो फूट केबलद्वारा वीज तथा पाण्याची खुलेआम चोरी सुरु होती. हा प्रकार लोकमतने कॅमेर्यामध्ये कैद करुन जतनेसमोर उघड करताच किन्हीराजा मंडळात एकच खळबळ उडाली होती. अनेक गावातील वीजचोरांनी नदी-नाले व तलावावरील केबल्ससह मोटरपंपाचा स्वत: गाशा गुंडाळला तर खैरखेडा गावालगतच्या नदीवरील जवळपास १५ केबल स्थानिक वायरमनने जप्त केले. वृत्ताची दखल घेत मालेगाव वीजमंडळाचे सहायक अभियंता राजेश चव्हाण यांनी स्वत: चाकातीर्थ संग्राहक तलावावरील अवैध वीजजोडणी असलेले वीस केबल गुंडाळून कार्यालयात जमा केल्याने वीजचोरांमध्ये दहशत निर्माण झाल्याचे दिसते. वीज मंडळ अधिकार्यांची ही कार्यवाही ठराविक गावापुरती औटघटकेची न ठरता सार्वत्रिक राबविली जाण्याची अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली.
अवैध वीज जोडणी करणा-यांचे केबल केली जप्त
By admin | Updated: December 6, 2014 01:18 IST