वाशिम : इतरांना स्वच्छतेचे धडे देणाºया सरकारी रुग्णालय परिसरातच अस्वच्छता पसरली असून, जैव वैद्यकीय कचºयांचे ढीग लागले आहेत. ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानांतर्गतच जिल्हा सामान्य रुग्णालयासह सरकारी रुग्णालय परिसरात स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याने रुग्ण व नातेवाईकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. घाणीचे साम्राज्य, अस्वच्छतेमुळे विविध आजारांना निमंत्रण मिळत असल्याने सर्वत्र स्वच्छता राखण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे केले जाते. स्वच्छतेसंदर्भात जनजागृती म्हणून सद्यस्थितीत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविले जात आहे. स्वच्छतेचा संदेश देणाºया सरकारी रूग्णालय परिसरात स्वच्छता राखली जाते की नाही याची पाहणी १८ सप्टेंबर रोजी केली असता, अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. जिल्हा सामान्य रूग्णालयाप्रमाणेच तालुकास्तरावर असलेल्या ग्रामीण रुग्णालय परिसरातही घाणीचे साम्राज्य असून, जैववैद्यकीय कचºयाचे ढीग असल्याचे दिसून येते. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरात अकोला नाकास्थित २०० खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय उभारण्यात आले आहे. अगोदरच वैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांची रिक्त पदे असल्याने नानाविध समस्यांना सामोरे जावे लागणाºया जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाला जैववैद्यकीय कचºयाची विल्हेवाट लावण्याचे यशस्वी नियोजन अद्याप जमले नाही. रुग्णांच्या उपचारादरम्यान वापरलेले हँडग्लोव्हज, रक्ताने माखलेले कापसाचे बोळे, दुषित सुया, सर्जिकल ब्लेड आदी स्वरूपातील 'बायोमेडिकल वेस्ट'ची ( जैववैद्यकीय कचरा) योग्य विल्हेवाट लावण्याच्या आरोग्य विभागाच्या सूचना आहे. तथापि, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात 'बायोमेडिकल वेस्ट' कुठेही फेकून दिले जात असल्याने दुर्गंधी पसरण्याबरोबरच प्रशासनाचे दिरंगाई धोरणही चव्हाट्यावर आले आहे. रुग्णालयाच्या बाह्य परिसरातही सर्वत्र कचºयाचे ढीगार साचत आहेत.
सरकारी रुग्णालय परिसरातच जैव वैद्यकिय कचऱ्याचे ढिग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 17:40 IST