वाशिम : वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी खासदारकीच्या २२ वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल १०० कोटींचा घोटाळा केला, असा घणाघाती आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला. घोटाळ्याचे आपणाकडे सबळ पुरावे असून ईडी, सीबीआय, सहकार मंत्री, आयकर विभाग यांसह अन्य ठिकाणी तक्रारी करण्यात आल्याचेही ते म्हणाले.
भाजपाच्या जिल्हा कार्यालयात २० ऑगस्ट रोजी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी त्यांच्या कार्यालयातून पहाटे पाच वाजता ७ कोटींची रक्कम चोरीला गेल्याची तक्रार (एएफआयआर क्रमांक ३८९/२०२०) तब्बल दहा महिन्यानंतर रिसोड पोलिसांत दाखल केली. मुळात एवढी मोठी रक्कम कार्यालयात ठेवण्याचे कारण काय? त्यातही ही रक्कम गवळी यांच्याकडे नेमकी कोठून आली, असा सवाल त्यांनी गवळींऐवजी थेट शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला. महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांकडून केल्या जाणाऱ्या वसुलीतून हा पैसा जमला का, असाही प्रश्न यावेळी सोमय्या यांनी उपस्थित केला. ५५ कोटींचा बालाजी पार्टीकल बोर्ड कारखाना खासदार भावना गवळी यांनी केवळ २५ लाखाला खरेदी केला. या व्यवहारातही मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे. त्यांच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडिया यासह इतर काही बँकांचे ११ कोटींचे कर्ज आहे, असे सांगून आपली मालमत्ता बँकेने जप्त केली का? डीफाॅल्टर झाल्याचे बँकांनी घोषित केले का? असे प्रश्न सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केले. पत्रकार परिषदेला भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे, तेजराव पाटील थोरात आदींची उपस्थिती होती.
..............
बाॅक्स
मुख्यमंत्री ठाकरे व पोलीस गवळींना
‘प्रोटेक्ट’ करीत आहेत- सोमय्या
खासदार भावना गवळी व समूहाने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला. त्याचे सबळ पुरावेदेखील आहेत. असे असतानाही त्यांच्याविरुद्ध अद्याप कुठलीच कारवाई झालेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलीस प्रशासन गवळींना ‘प्रोटेक्ट’ करीत आहेत. हेच त्यामागील मुख्य कारण असल्याचे भाजपा नेते किरीट सोमय्या म्हणाले.