वाशिम :येथील पंचशील नगरमधील एका बंद घराची खिडकी तोडून अज्ञात चोरट्याने दोन लाख रूपये रोख व ५0 हजाराची सोन्याची पोत लंपास केली. ही घटना ३ फेब्रुवारी रोजी दिवसा घडली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या पंचशील नगरमध्ये जब्बारखाँ सत्तारखाँ पठाण वास्तव्यास असतात. पठाण यांनी घरबांधकामासाठी दोन लाख रुपये जमा करून ठेवले होते. ही रक्कम त्यांनी घरामध्ये असलेल्या कपाटात ठेवली होती. पत्नीची प्रकृती चांगली नसल्याने ते आपल्या पत्नीच्या उपचारासाठी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता बाहेरगावी दवाखान्यामध्ये गेले होते. रात्री दहा वाजता परत आल्यानंतर त्यांना घरामधील कपाट तोडलेल्या अवस्थेत आढळून आले. कपाटामध्ये ठेवलेले रोख २ लाख व ५0 हजार रुपये किमतीची सोन्याची पोत लंपास झाल्याचे आढळून आले. या घटनेची पठाण यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून, घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक उदय सोयस्कर यांच्याकडे सोपविला आहे. जिल्हय़ात चोरीच्या सत्रामध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असून, पोलीस विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले असल्याचे मत नागरिकांत व्यक्त होत आहे.
भरदिवसा घरफोडी
By admin | Updated: February 5, 2015 01:21 IST