आपल्या वैविध्यपूर्ण परंपरेने ओळखल्या जाणाऱ्या बंजारा समाजाच्या पिढी परंपरेनुसार चालत आलेला तिजोत्सव ३० व ३१ ऑगस्ट रोजी कारंजा शहरातील बंजारा काॅलनी परिसरात असलेल्या वसंतराव नाईक सभागृहात नायक व कारभारी यांच्या हस्ते तिज (ज्वारा) चे पूजन करून साजरा करण्यात आला.
दरवर्षी मोठ्या हर्षोल्हासाने व मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा बंजारा समाजातील तिजोत्सव हा यावर्षी अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने वसंतराव नाईक सभागृह नजीकच समाजाचे पारंपरिक नृत्य करून साजरा करण्यात आला. नारळीपाैर्णिमेला सायंकाळी तांड्याचे नायक यांचे घरी समाजातील तरूणी ह्या जमतात व तिजची पेरणी करतात. व त्यानंतर १० दिवस तिज अर्थात ज्वारा पेरून कुमारिका मुली ह्या दररोज सकाळ संध्याकाळ पाणी टाकून तिजची पूजा करतात. व गोकुळ अष्टामीला तिजेची तोडणी करतात. या कालावधीत मोठ्या झालेल्या ज्वाराची तोडणी झाल्यानंतर विसर्जनाकरिता निघालेल्या मिरवणुकीत कुमारिका मुली व महिला ह्या हातात ज्वाराच्या टोपल्या घेऊन मिरवणुकीत नृत्य करतात. परंतु यावर्षी कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे शासनाच्या नियमांचे पालन करून तिजची मिरवणूक न काढता समाजातील मुली व महिला यांनी पारंपरिक वेषभूषा परिधान करून सभागृह परिसरातच नृत्य केले . तसेच कारंजा तालुक्यातील गिर्डा येथे सुध्दा बंजारा समाजाचा तिज उत्सव २२ ते ३१ ऑगस्ट या दरम्यान साजरा करण्यात आला. या उत्सवात गावातील तसेच कारंजा शहरातील अनेक समाजबांधव सहभागी झाले होते.