वाशिम : यवतमाळ वीज मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता अशोक फुलकर यांना बेकायदेशीररीत्या तडकाफडकी ४ मे ला मुख्य अभियंता यांनी निलंबित केले. त्या विरोधात मागासवर्गीय वीज कामगार संघटना वाशिम विभाग यांनी ६ मे ला दुपारी १.३0 वाजता वाशिम येथील विद्युत भवन कार्यालयासमोर वीज कंपनी प्रशासनाच्या विरोधात ह्यहल्लाबोलह्ण आंदोलन करुन कार्यालयाच्या द्वार सभेत जाहीर निषेध केला.बाभूळगाव येथील कृषी पंपास वीज पुरवठाप्रकरणी व तेथील एक शेतकरी दगावल्या गेला त्याबाबत दोषींवर योग्य ती कार्यवाही व्हायला पाहिजे व तत्कालीन संबंधित अधिकार्यांची चौकशीसुद्धा व्हायला पाहिजे. हे प्रकरण सप्टेंबर २0१४ पासूनचे आहे. तेव्हापासून तो शेतकरी धास्तीने आजारी पडला, असे काही ग्राहकांचे म्हणणे आहे; परंतु अधीक्षक अभियंता अशोक फुलकर हे गोंदियावरून पंधरा दिवसापूर्वीच यवतमाळ येथे अधीक्षक अभियंतापदी रुजू झाले. त्यामुळे त्यांना या बाबींची कोणतीही माहिती नव्हती; परंतु या प्रकरणात त्यांना बळीचा बकरा ठरविण्यात आला, असा संघटनेने आंदोलनावेळी आरोप केला आहे. तरी कंपनी प्रशासनाने सन्मानपूर्वक फुलकर यांच्यावरील निलंबनाची कार्यवाही मागे घ्यावी, अन्यथा मागासवर्गीय वीज कामगार संघटना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा द्वारसभेत मागासवर्गीय संघटनेने दिला.
वीज कामगारांचे ‘हल्ला बोल’ आंदोलन
By admin | Updated: May 9, 2015 01:47 IST