वाशिम : शहरातील एका उर्दू शाळेच्या मागे १२ वर्षीय मुलीवर बलात्कार करणारे आरोपी गेल्या दोन दिवसांपासून शहरामधून फरार झाले होते. या दोनही आरोपींचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांना आकोट व हिंगोली येथून २९ डिसेंबरला पहाटे ताब्यात घेऊन अटक केली. शहरातील इनामदारपुरा परिसरात असलेल्या उर्दू शाळेच्या परिसरात अज्ञात दोन युवकांनी एका १२ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना २६ डिसेंबर रोजी घडली. दोन दिवस उलटल्यानंतर या घटनेची वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये पीडित बालिकेने फिर्याद दाखल केली. या घटनेतील आरोपी अब्दुल वसीम अब्दुल वहाब (वय २0, रा. शेरकी दर्गा जवळ, वाशिम) याला आकोट तालुक्यातील अकोलखेड येथून स्थानिक गु्न्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या घटनेतील दुसरा आरोपी शे. समीर शे. जलील ऊर्फ रमजान (वय २0, रा. इनामदारपुरा, वाशिम) याला हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव परिसरामधून शहर पोलिसांनी अटक केली. उपरोक्त कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर व पोलीस उपविभागीय अधिकारी नरेश मेघराजानी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकामध्ये सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण, लक्ष्मण कोल्हे, बुध्दू रेघीवाले, संजय नंदकुले, रजनी सरकटे, मिलिंद गायकवाड तर शहर पोलीस पथकामध्ये पीएसआय योगेश धोत्रे, राजेश बायस्कर, मंगेश नरवाडे व सतीश गुळदे यांचा समावेश होता. तपास अधिकारी सचिन गवळी यांच्या ताब्यात दोन्ही आरोपी आहेत.
बलात्कार प्रकरणातील आरोपींना अटक
By admin | Updated: December 30, 2015 01:55 IST