जऊळका रेल्वे : नजीकच्या हनवतखेडा येथे २६ जूनच्या रात्री अज्ञात इसमांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ाला व बौद्ध विहाराच्या भिंतीला शेण फासून विटंबना केल्याची बाब २७ जून रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी जऊळका रेल्वे पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे. सध्या परिस्थिती शांत व नियंत्रणात आहे.याप्रकरणी पोलिस सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार हनवतखेडा येथील वस्तीत असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ाला व बौध्द विहाराच्या भिंतीला कुणी तरी २६ जूनच्या रात्री शेण लावले असल्याची बाब २७ जूनच्या सकाळी हनवतखेडा येथील लोकांना दिसून आली. त्यामुळे तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. तेथील लोक मोठया संख्येने जऊळका पोलिस स्टेशनमध्ये दुपारी १ वाजता पोहोचले. या घटनोबाबत तुकाराम सूर्यभान भगत यांनी जऊळका रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द भादंविच्या २९५ कलमानुसार गुन्हा नोंदवला.याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या चौकशीत सुभाष कडूजी तिवाले वय २१ व गोपाल समाधान डाखोरे वय १९ यांना अटक केली आहे.
आंबेडकरांच्या पुतळ्यासोबतच धार्मिक स्थळाची विटंबना
By admin | Updated: June 28, 2014 01:41 IST