शिरपूर येथील पांगरखेडा रस्ता नजीकच्या एका शेतात तीन डोंबारी आपापल्या कुटुंबासह पाल ठोकून राहात आहेत. तीन डोंबाऱ्याची जवळपास चिल्लीपाल्ली २० मुलेही त्यांच्यासोबत आहेत. दिवसभर गावात मुलांच्या सहकार्याने डोंबारी खेळ करीत. हा खेळ पाहून जो काही खेळ पाहणारा मोबदला मिळायचा त्यांच्यावर त्यांची गुजराण चालायची. सायंकाळी आपल्या पाल ठोकलेल्या ठिकाणी पोहोचून रात्र काढायची. अशातच शुक्रवारी रात्री शिरपूर परिसरात गारपीट वादळी पाऊस झाला. गावात ब-याच ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर काही लोकांचा घरावरील टिनपत्रेसुद्धा उडाली. मात्र नैसर्गिक संकटातही डोंबा-याचे पाल दोन-तीन बाभळीच्या झाडाखाली मजबुतीने तग धरून उभे होते. वादळी वाऱ्याने एका बाभळीच्या झाडाची फांदी व तुटली. दैव बलवत्तर ही फांदी पालाच्या दुसऱ्या बाजूला झाडाचा सालीच्या आधाराने अटकून राहिली व एवढ्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीतही खुल्या मैदानात वास्तव्य करणाऱ्या डोंबाऱ्याला व परिवाराला कुठलीही हानी झाली नाही. सकाळी डोंबा-यांनी बाभळीच्या झाडाखालची पाले थोडी बाजूला ठोकली व आपली दिनचर्या सुरू केली. या विषयी डोंबारी परिवारातील एका महिलेने सरकारने आमच्या साठी काहीतरी करावे. आम्हाला जीवन असेच उघड्यावर कंठावे लागत आहे. अशी संकटे आमच्या जीवनात नित्याचीच आहेत. मायबाप सरकारने आमचा विचार करावा, असे म्हटले.
गारपीट, वादळवाऱ्यानंतर पुन्हा थाटले बिऱ्हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:40 IST