वाशिम: खासगी माध्यमिक शाळेतील अतिरिक्त ठरलेल्या ४६ शिक्षकांची सेवा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळांमध्ये ऐच्छिक व तात्पुरत्या स्वरूपात घेण्याचा निर्णय शिक्षण समितीने घेतला असून, या निर्णयाची अंमलबजावणी करण्याला सुरुवात झाली आहे. जिल्हय़ात जिल्हा परिषदेंतर्गत ७७४ प्राथमिक; तर नऊ माध्यमिक शाळा आहेत. या शाळांवर सध्या शंभरपेक्षा अधिक मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत. २५ केंद्रप्रमुख, तीन वरिष्ठ विस्तार अधिकारी, पाच कनिष्ठ विस्तार अधिकारी यासह सहापैकी पाच तालुक्यांमधील गटशिक्षणाधिकारी ही सर्व पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळांमध्ये एकूण २८ पदे रिक्त आहेत. ती भरण्यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर ठोस हालचाल नसल्याने हा प्रश्न ह्यजैसे थेह्ण आहे. दुसरीकडे खासगी माध्यमिक शाळेवरील ४६ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. या अतिरिक्त शिक्षकांची सेवा तात्पुरत्या व ऐच्छिक स्वरूपात जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेवर घेतली तर २८ रिक्त पदांची उणीव भरून निघेल, यावर शिक्षण समितीच्या सभेत मंथन झाले. जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती चक्रधर गोटे, प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक गिरी व उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे व शिक्षण समितीचे सदस्य या सर्वांच्या समन्वयातून अतिरिक्त शिक्षकांची सेवा तात्पुरत्या व ऐच्छिक स्वरुपात जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेवर घेण्याचा निर्णय झाला. या निर्णयाच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून आता अतिरिक्त शिक्षकांची चाचपणी सुरू आहे. ऐच्छिक स्वरुपात सेवा देण्यास तयार असलेल्या अतिरिक्त शिक्षकांना जि.प.च्या शाळेवर तात्पुरत्या स्वरुपात घेतले जाणार असल्याची माहिती सभापती चक्रधर गोटे यांनी दिली.
अतिरिक्त शिक्षक जि.प. शाळांवर शिकविणार!
By admin | Updated: December 23, 2015 02:26 IST