लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा : गत ५६ दिवसांपासून देशासह राज्यात कोरोनामुळे संचारबंदी जाहीर झाल्याने सर्व व्यवसाय ठप्प झाले. परिणामी रोजगारही बंद झाला. शिवाय अलिकडेच राज्यशासनाने परराज्यात व परजिल्ह्यात अडकलेल्या मजूरांना आपआपल्या गावी जाण्यास परवानगी दिल्याने महानरागरातून मजूरांचे लोंढे ग्रामीण भागात दाखल होतांना दिसत आहे. अशा परिस्थितीत एका ट्रकमधून ७२ मजूर प्रवास करीत असल्याचे आढळून आल्याने वाशिम मोटार वाहन निरीक्षकांनी ट्रकचालकाविरूध्द अवैध वाहतूक प्रकरणी कारवाई केली.एम. एच.०४ ई वाय ६२६७ क्रमांकाच्या ट्रकने अहमदनगर येथून ७२ मजूर आसामला जात होेते. १७ मे रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान कारंजा शहरालगत असलेल्या नागपूर औरंगाबाद दृतगती मार्गावर सदर ट्रक पकडण्यात आला. त्यानंतर त्या ट्रकमधील ७२ मजूरांची कारंजा उपजिल्हा रूग्णालयात तपासणी करण्यात आली. त्या मजूरांची ध्यास स्वयंसेवी संस्थेच्यावतीने जेवनाची व्यवस्थाही करण्यात आली.पुढील प्रवासासाठी त्यांना कारंजा आगाराच्या ३ एस. टी. बस उपलब्ध करून देण्यात आल्या. दरम्यान अवैध प्रवासी वाहतूक करणारा ट्रक मोटार वाहन निरीक्षकांनी ताब्यात घेतला . सदरची कारवाई वाशिम वाहन निरीक्षक संजय पवार, कैलास भरकाडे व एस. टी .महामंडळाचे वाहतूक निरीक्षक महेंद्र तिवाले यांनी केली. दरम्यान कारंजा उपजिल्हा रूग्णालयात एकाच वेळी ७२ जण तपासणीसाठी आल्याने खळबळ उडाली होती. या रस्त्यावरुन दररोज अनेक वाहने जात असून वाहनाची कसून चौकशी करणे गरजेचे झाले आहे.
अवैध वाहतूक प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 16:11 IST