शेलूबाजार येथील मेहबूब याकूब (वय ३५) यांनी २२ फेब्रुवारी रोजी पोलिसांत तक्रार दिली होती की, ऑक्टोबर २०२० मधे मध्य प्रदेशातील कनोज येथून एक हार्वेस्टर मशीन हरप्रीतसिंग सतविंदरसिंग, रा. पटीयाला, पंजाब यांच्याकडून नोटरी करून खरेदी करून व्यवसायासाठी वापरत होतो. १० ऑक्टाेबरला खरेदी संबंधाने नोटरी केली होती. त्याचे पैसेसुद्धा हरप्रीतसिंग याने दिलेल्या बँकेच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात आले हाेते. नंतर हार्वेस्टर घेऊन घरी आल्यानंतर काही दिवसाने मी पटीयाला येथील कुलदीपसिंग यांना फोन करून मला हार्वेस्टर चालविण्यासाठी चालकाची गरज आहे. त्याकरिता मला तुमच्या ओळखीचा चालक पाठवा, असे सांगितले. तेव्हा कुलदीप याने तीन चालक पाठवितो असे सांगितले. तेव्हा मी तीनपैकी एक बलविंदरसिंग याच्या मागणीवरून ॲडव्हान्स म्हणून १५ हजार रुपये बलविंदरसिंग याचे बँक अकाउंटवर पाठविले. १२ फेब्रुवारी राेजी रात्रीच्या दरम्यान पटीयाला पंजाब येथील कुलदीपसिंग याने पाठविलेले तीन चालक आले. त्यामधे बलविंदरसिंग, युवराजसिंग व आणखी एक त्याचे नाव माहीत नाही असे आले होते. त्यांना मी माझे हार्वेस्टर दाखविले. तिघांवर विश्वास ठेवून हार्वेस्टर त्यांच्या ताब्यात दिले. त्यानंतर त्या तिघांनी मिळून त्या वर्कशॉपवर हार्वेस्टर दुरुस्ती केली. त्यावेळी त्यांच्यासोबत माझा भाचा शेख वसीम थांबला. नंतर रात्रीदरम्यान मी माझ्या घरी निघून गेलो. त्यानंतर माझा भाचा शेख वसीम याचा मला फोन आला की, आपल्याकडे कामाला आलेली माणसे दिसत नाहीत. तसेच आपले हार्वेस्टर पण नाही, असे सांगितले व माझी फसवणूक केली. या तक्रारीवरून पोलिसांनी तीनजणांविरुद्ध कलम ४०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी पंजाबमध्ये जाऊन माहिती मिळवली असता ते हार्वेस्टर मध्य प्रदेशातील हरदा येथे असल्याचे समजले. यावरून डी.बी पथकाने याठिकाणी जाऊन हार्वेस्टर ताब्यात घेतले. डी.बी पथकाचे अमोल मुंदे, मोहम्मद परसुवाले, सचिन शिंदे, रवी वानखडे यांनी ही कारवाई केली.
पळवून नेलेले हार्वेस्टर पोलिसांनी मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:43 IST