वाशिम : अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चार संचालक पदासाठी ५ मे रोजी जिल्ह्यातील २७८ पैकी २६६ मतदारांनी चार मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची सरासरी टक्केवारी ९५.६८ असून, कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. दि. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी जिल्ह्यातील ३५ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज सादर केले होते. त्यापैकी २३ जणांनी माघार घेतल्याने आणि दोन जागा अविरोध झाल्याने मालेगाव, वाशिम, कारंजा व मानोरा या चार तालुका सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघात निवडणुक झाली. ५ मे रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान ना.ना. मुंदडा विद्यालय मालेगाव, श्री शिवाजी विद्यालय वाशिम, विद्याभारती विद्यालय कारंजा लाड व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसंतनगर मानोरा या चार केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडली. मानोरा तालुका सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघात ३३ पैकी ३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कारंजा तालुका सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघात ६0 पैकी ५0 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.वाशिम तालुका सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघात ९८ पैकी ९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर मालेगाव तालुका सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघात ८७ पैकी ८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
अकोला जिल्हा सहकारी बॅकेच्या निवडणुकीत ९५ टक्के मतदान
By admin | Updated: May 6, 2015 00:20 IST