मंगरुळपीर शहराला लागून असलेल्या कारंजा रोडवरील शामसुंदर दामोदर बाहेती यांनी भाडेतत्त्वावर घेतलेल्या खासगी गोदाम येथे सहायक जिल्हाधिकारी तथा मंगरुळपीर तहसिलदार वैभव वाघमारे (भाप्रसे), निरीक्षण अधिकारी रुपाली सोळंके, पुरवठा निरीक्षक सीमा दोंदल व सहायक पोलीस निरीक्षक तुषार जाधव यांच्यासह पोलीस व महसूल चमूने ७ जानेवारी रोजी छापा मारला. यावेळी गोदामामध्ये गहू, तांदूळ, चणाडाळ व मसुर डाळ असे एकूण अंदाजे ३७५.३३ क्विंटल धान्य आढळून आले असून हा धान्य साठा जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे गोदामही सिल केले तसेच पीएस १६ युबी ५३९८ क्रमांकाचा ट्रक व एमएच ३७ - टी १५१८ क्रमांकाचे वाहन अशी एकूण दोन वाहने जप्त करण्यात आली. जप्त धान्यसाठा हा शाम बाहेती , नफीस खान , रवी जाधव व मोहनावाले यांचा असल्याचे चाैकशीदरम्यान समोर आल्याचे वाघमारे यांनी सांगितले. धान्य साठा मोजण्याची कारवाई सुरु आहे . यापुढेही तालुक्यामध्ये अशा प्रकारची वारंवार कारवाई करण्यात येणार असून रास्त भाव दुकानदार व व्यापाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे, असे आवाहन वैभव वाघमारे यांनी केले.
३७५ क्विंटल धान्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:46 IST