शंकर वाघ - शिरपूर जैन (वाशिम)लग्नात होणारा अनाठायी खर्च टाळण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात मुस्लीम रिवाजानुसार २७ जोडप्यांचे विवाह अवघ्या २५ मिनिटांत पार पडले. वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे गवळी समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या या सोहळ्यात नववधूंना प्रत्येकी २० तोळे चांदीचे दागिनेही भेट देण्यात आले.साक्षरतेचे प्रमाण कमी असलेल्या गवळी समाजाच्या वतीने शिरपूर येथे गत चार वर्षांपासून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाही या सोहळ्याचे आयोजन २३ एप्रिल रोजी करण्यात आले. या समाजात मुस्लीम पद्धतीने विवाह पार पडतात. यासाठी एक काजी आणि साक्षीदार म्हणून दोन व्यक्तींची निवड केलेली असते. त्यांना वकील असेही म्हणतात. या पद्धतीत विवाह सोहळ्याला सुरुवात करण्यापूर्वी काजीकडून साक्षीदारांचीही कबुली घेतली जाते आणि त्यानंतर वर आणि नववधूचीही स्वतंत्र कबुली घेतली जाते. त्यामुळे हा विवाह सर्वांसाठी एक वेळा मंत्रोच्चार करून संपन्न होऊ शकत नसतानाही शिरपूर येथील गवळी समाज बांधवांच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे अवघ्या २५ मिनिटांत २७ जोडपी विवाहबद्ध होऊ शकली. उल्लेखनीय म्हणजे या सोहळ्यात सहभागी झालेल्या जोडप्यांमधील नववधूंना सोहळ्यासाठी जमा झालेल्या निधीमधून उरलेल्या रकमेत प्रत्येकी २० तोळे चांदीचे दागिनेही आयोजकांनी भेट देण्यात आले. यामुळे हा सोहळा अनाठायी खर्च टाळून समाजहित साधण्यासाठी आयोजित करण्यात येत असल्याचे सिद्ध केले. या विवाह सोहळ्यात अंबाजोगाई, लोणार, मेहकर, कारंजा, वाशिमसह दहा जिल्ह्यातील २० हजारांहून अधिक गवळी बांधवांसह मुस्लीम तथा हिंदू बांधवांचीही उपस्थिती होती.
अवघ्या २५ मिनिटांत पार पडले २७ विवाह!
By admin | Updated: April 24, 2017 01:13 IST