शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या महिला वगळता इतर सर्व घटकांतील महिलांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ दिला जातो. पहिल्या अपत्यासाठी तीन टप्प्यात पाच हजार रुपये दिले जातात. योजनेअंतर्गत पहिला हप्ता एक हजार रुपये मिळण्यासाठी लाभार्थी महिलेने गरोदरपणाची नोंद आर.सी.एच. पोर्टलमध्ये ए.एन.एम. यांच्याकडे मासिक पाळी चुकल्यानंतर १५० दिवसांच्या आत करणे आवश्यक आहे. दोन हजार रुपयांचा दुसरा हप्ता मिळण्यासाठी गरोदरपणाच्या ६ महिन्यांत (१८० दिवस) किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी होणे गरजेचे आहे. तिसरा हप्ता दोन हजार रुपये मिळण्यासाठी प्रसुतीनंतर बाळाच्या जन्माची नोंद बीसीजी, ओपीव्ही (झिरो डोस) याची एक मात्रा तसेच पेंटाव्हॅलेंट, ओपीव्ही लसीच्या तीन मात्रा घेणे आवश्यक आहे.
मातृ वंदना योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी महिला व तिच्या पतीचे आधारकार्ड, लाभार्थीचे आधार संलग्न बँक खाते, गरोदरपणाची शासकीय आरोग्य संस्थेत गरोदर दरम्यान तपासणी, बाळाचा जन्म नोंदणी दाखला व प्राथमिक लसीकरण करणे आवश्यक आहे.
...............
७ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सप्ताह
जिल्ह्यात १ ते ७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत प्रधानमंत्री मातृ वंदना सप्ताह राबविण्यात येत आहे. १ सप्टेंबर रोजी या सप्ताहास रीतसर सुरुवात झाली. कार्यक्रमास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. देशमुख, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. मंजुश्री जांभरुणकर, आदींची उपस्थिती होती.