वाशिम : वेळीच निदान, उपचार मिळणे आणि आरोग्यविषयक नियम पाळले, तर कोरोनावर सहज मात करता येते, हे जिल्ह्यातील २० हजार ३८८ जणांनी सिद्ध केले आहे. आतापर्यंत २० हजार ३८८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्यात ३ एप्रिल रोजी मेडशी येथे कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून होता. दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्ग झाल्याची लक्षणे जाणवताच तातडीने चाचणी करणे, डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधी घेणे, सकारात्मक विचार, पाैष्टिक आहार, आरोग्यविषयक पथ्ये पाळणे, यामुळे कोरोनावर लवकर मात करता येते. आजार लपविला किंवा वेळीच निदान व उपचार मिळाले नाहीत, तर कोरोनातून बरे व्हायला थोडा विलंब लागू शकतो. त्यामुळे सर्दी, ताप, खोकला किंवा अन्य कोरोनाविषयक लक्षणे दिसून येताच तातडीने कोरोना चाचणी करणे हे शहाणपणाचे लक्षण ठरू शकते. वेळीच निदान व उपचार झाल्याने जिल्ह्यातील २० हजार ३८८ जणांनी कोरोनावर सहज मात केली आहे. त्यामुळे घाबरू नका, काळजी घ्या, असा सल्ला डाॅक्टरांनी दिला.
००
कोरोनाविषयक लक्षणे दिसून आल्याने ताबडतोब चाचणी केली. वेळीच निदान व उपचार घेतल्याने कोरोनातून पूर्णपणे बरा झालो. कोरोनाला घाबरू नका, तर आवश्यक ती काळजी घ्या. कोरोनाविषयक नियमांचे पालन करा.
-शंकर शेंडे, वाशिम
०००
कोरोना चाचणीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला म्हणून अजिबात घाबरून जाऊ नका. वेळीच उपचार घ्या आणि डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार वागणूक ठेवा. नकारात्मक विचार करू नका. कोरोनावर सहज मात करता येते.
-राहुल वसमतकर, वाशिम
००
कोरोनाविषयक लक्षणे दिसून आली, तर आजार लपवू नका. त्यामुळे धोका संभवतो. वेळीच निदान व उपचार मिळाले, तर कोरोनातून रुग्ण लवकरात लवकर पूर्णपणे बरा होतो.
-सुनील दिग्रसकर, वाशिम
००
हिंमत ठेवा, आनंदी राहा
कोरोना काळात मनाने कधीही खचून जाऊ नका. सकारात्मक विचार करून आनंदी राहा. कोराेनातून बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे आपण काेरोनाला सहज हरवू शकतो, असा विचार करून वेळीच औषधोपचार घ्या.
-डाॅ. नरेश इंगळे, मानसोपचारतज्ज्ञ