शेतात कष्टाने कामे करताना किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याला इजा झाल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळते. घराचे अर्थकारण शेतकऱ्यावरच अवलंबून असल्याने समस्या अधिक गंभीर बनते. या संकटातून सावरण्यासाठी आणि त्याला किंवा त्याच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यासाठी कृषी विभागातर्फे शेतकरी जनता अपघात विमा योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत सर्पदंश, रस्ता अपघात, पाण्यात बुडून, विजेचा धक्का लागून, तसेच वीज अंगावर पडून जिल्ह्यातील ४८ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यापैकी ३५ जणांच्या कुटुंबांनाच मदत मिळू शकली आहे.
----------
२०२० साली दाखल आणि मंजूर प्रस्ताव
रस्ता अपघात, वाहन अपघात- दाखल ३५, मंजूर २१
विजेचा धक्का - दाखल ६, मंजूर ६
सर्पदंश दाखल -०३, मंजूर ३
बुडून किंवा उंचावरून पडून -दाखल ४, मंजूर ३
-----
सर्वाधिक प्रकरणे अपघाताची
जिल्ह्यात २०२० या वर्षांत विविध अपघातात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यापैकी ४८ शेतकऱ्यांच्या कुटुंबांनी शेतकरी अपघात विमा योजनेत मदतीसाठी कृषी विभागाकडे प्रस्ताव दाखल केले.
कृषी विभागाकडे दाखल प्रस्तावात रस्ता, वाहन अपघात, वीज पडून, विजेचा धक्का लागून, सर्पदंशाने, पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या प्रकरणांचा समावेश आहे. तथापि, सर्वाधिक ३४ प्रकरणे रस्ता अपघातात झालेल्या मृत्यूंची आहेत.
-------
कोट : जिल्ह्यात गतवर्षी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत विविध प्रकारचे ४८ प्रस्ताव मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबांकडून मदतीसाठी सादर करण्यात आले होते. शासन निकषानुसार या प्रस्तावांची पडताळणी करून पात्र प्रकरणातील शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत मंजूर करण्यात आली असून, अपात्र पकरणे रद्द करण्यात आली आहेत.
-शंकर तोटावार,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम