---------
कारंजा शहरात आणखी पाच बाधित
वाशिम : आरोग्य विभागाकडून शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार कारंजा तालुक्यातील आणखी पाच व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यात कारंजा शहरातील पाच व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. या सर्वांवर कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करून उपचार करण्यात येत आहे. दरम्यान, तालुका आरोग्य विभागाकडून कोरोना चाचणीची मोहीम राबविली जात आहे.
----------
वीजपुरवठा खंडित; कामकाज प्रभावित
कामरगाव : गत काही दिवसांपासून विद्युतपुरवठ्यात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. गुरुवारीदेखील दुपारच्या सुमारास असाच प्रकार घडल्याने कार्यालयीन कामकाज प्रभावित झाले. ग्रामपंचायत कार्यालय, बँकांमधील कामांवर त्याचा परिणाम झाला.
------
जलस्रोतांमध्ये घट; पाणीटंचाईचे संकेत
जऊळका रेल्वे : रब्बी पिकांच्या सिंचनासाठी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात उपसा होत असल्याने जऊळका परिसरातील जलस्रोतांमध्ये घट होत आहे. त्यामुळे पुढील काळात उपशावर नियंत्रण न मिळविल्यास पाणीटंचाईची समस्या उद्भवण्याची भीती निर्माण झाली असून, प्रशासनाने उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.
----
६५ जणांची आरोग्य तपासणी
रिठद : रिसोड तालुक्यात कोरोना विषाणूंंचा संसर्ग नियंत्रणात येत असला तरी, दरदिवशी विविध ठिकाणी कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर तालुका आरोग्य विभागाने कोरोना चाचणीला वेग दिला असून, ग्रामस्थांची आरोग्य तपासणीही सुरू केली आहे. रिठद येथे गुरुवारी ६५ लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
--------
खरिपासाठी बीज प्रक्रिया प्रशिक्षण
उंबर्डा : कृषी विभागाकडून पुढील हंगामासाठी शेतक-यांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने बियाणे उगवण शक्ती तपासणे व बीजप्रक्रियेसंबंधीचा प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात येत आहे. या अंतर्गत परिसरातील शेतकरी समूह सहायता बचत गटास प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक व शेतकरी उपस्थित होते.
--------
गावात स्वच्छता अभियान
धनज बु.: कारंजा तालुक्यातील धनज बु. येथे रस्त्यावर कचरा टाकण्यात येत असल्याने गावात घाण वाढत आहे. या पृष्ठभूमीवर सरपंचांच्या मार्गदर्शनात ग्रामसचिवांनी सभा घेऊन स्वच्छता राखण्याबाबत मार्गदर्शन केले, तसेच गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानातून घाण-कच-याची विल्हेवाट लावण्यात आली.
----------