पालघर : पालघर जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येणाऱ्या ‘जागर स्वच्छतेचा, सन्मान नवनिर्मित पालघर जिल्ह्याचा’ या अभियानांतर्गत जिल्ह्यातील गावागावांत स्वच्छता मोहीम राबविताना समाजातील प्रत्येक घटकाला या मोहिमेत सामावून घेत त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून द्यावे, असे जि.प.च्या अध्यक्षा सुरेखा थेतले यांनी सांगितले.स्वच्छ भारत मिशनअंतर्गत स्वच्छतेचे महत्त्व सर्वांना पटावे, यासाठी २५ सप्टेंबर २०१५ ते ११ आॅक्टोबर २०१५ पर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून या अभियानाचा शुभारंभ जि.प. अध्यक्षांच्या हस्ते पार पडला. या वेळी उपाध्यक्ष संचित पाटील, कृषी सभापती अशोक वडे, बांधकाम सभापती सुरेश तरे, पं.स. सभापती रवींद्र पागधरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी.ए. चव्हाण, गविअ डी.वाय. जाधव इ.सह सर्व सदस्य उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व बसथांबे, आठवडाबाजार या ठिकाणी पथनाट्ये सादर करण्याबरोबर सर्व शाळांमध्ये वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगून गावोगावी स्वच्छता फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्याचे चव्हाण यांनी या वेळी सांगितले. तर, २ आॅक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त आयोजित ग्रामसभांमध्ये स्वच्छ भारत मिशनअंतर्गत स्वच्छता अभियानाला मिळणाऱ्या अनुदानाची माहिती उपस्थितांना देण्यात यावी, असेही सांगून प्रत्येक गट व गणांतील सदस्यांनी याची माहिती द्यावी, असे शेवटी सांगितले.स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत वैयक्तिक शौचालयासाठी १२ हजार इंदिरा आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरातील शौचालय, शाळांमधील शौचालये, अंगणवाडीमधील शौचालयांसाठी वेगळी तरतूद करण्यात आली असून ग्रामपंचायतींतर्गत सार्वजनिक शौचालयांसाठी दोन लाखांचा निधी देण्यात येणार असून या बांधकामांवर सर्व सदस्यांनी विशेष लक्ष पुरवावे, असेही या वेळी सांगण्यात आले. (वार्ताहर)
जि.प.चे ‘जागर स्वच्छतेचा’ अभियान
By admin | Updated: October 1, 2015 01:27 IST