वसई : तालुक्याच्या पूर्वेस नायगाव येथे असलेल्या जुचंद्र गावात श्री चंडिकादेवीचे मंदिर आहे. हे स्थान म्हणजे भक्तांच्या हाकेला धावून जाणारी देवी अशी श्रद्धा आहे. येथील डोंगरमाथ्यावर वसलेल्या या देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सव काळात विविध आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. येथील मंदिरात कालिकादेवी, महिषासुरमर्दिनी व चंडिकादेवी या तिन्ही मूर्ती आहेत.या मंदिराच्या न्यासाने नुकतेच या मंदिरात विविध विकासकामे करून ५ मजली भव्य मंदिर उभारले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिराच्या प्रांगणात नवरात्रोत्सवाला मोठ्या भक्तिभावाने सुरुवात झाली आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात चंडिकादेवीच्या यात्रेचे आयोजन करण्यात येते. या यात्रेमध्ये मुंबई व ठाणे परिसरातील शेकडो भाविक मोठ्या संख्येने जुचंद्र येथे येत असतात. या यात्रेदरम्यान परराज्यांतील व्यापारी आपला माल विक्रीसाठी येथे आणत असतात. तसेच यात्रेमध्ये मनोरंजनाचे विविध कार्यक्रम ठेवण्यात येत असल्याने बालगोपाळांचाही त्याला चांगला प्रतिसाद लाभतो. गेल्या काही वर्षांत या न्यासातर्फे शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
भक्तांचे श्रद्धास्थान चंडिकादेवी
By admin | Updated: October 19, 2015 01:02 IST