पालघर : पत्नीला मूल होत नाही व माहेरी जाण्यासाठी भांडण करीत असल्याचा राग मनात धरुन पिंकू उर्फ प्रेम प्रकाश यदुनाथ सिंग (२५) रा. गणेशनगर (राहुलचाळ) बोईसर याने आपल्या तेवीस वर्षीय पत्नीचा खून केल्याप्रकरणी पालघर सत्र न्यायालयाचे अतिरीक्त सत्र न्यायाधिश एम. एस. क्षीरसागर यांनी आरोपींस जन्मठेप व पाचशे रू. दंडाची शिक्षा सुनावली.तो आपली पत्नी रिंकू (२३) हिच्याबरोबर भाड्याच्या खोलीत राहत होता. लग्नानंतर तीन वर्षे उलटूनही पत्नीला मुळबाळ होत नसल्याने तो हताश होता. त्यातच पत्नीला व्यवस्थित जेवण बनवता येत नसल्याने व माहेरी (मुळ गाव उत्तरप्रदेश) जाण्यासाठी ती नेहमी भांडण उकरून काढत असल्याने आरोपी वैतागला होता. त्याने आपल्या पत्नीला माहेरी घेऊन जातो असे सांगून १३ डिसेबर २०१२ रोजी संध्याकाळी ६ वा. बाहेर नेले होते. बोईसर-पालघर रस्त्यावरील पंचाळी गावच्या स्मशानाजवळ एका अज्ञात महिलेचा मृतदेह पडल्याची माहिती पोलीस पाटलाने बोईसर पो. स्टे. ला दिल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत अज्ञात व्यक्ती विरोधात भादवि कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा तपास सहा. पो. नि. आचरेकर करीत असताना रिंकु हिचा खून तिच्या पतीनेच केल्याची व तो उत्तरप्रदेश मधील आपल्या गावी पळून गेल्याची माहिती मिळाली. पोलीसांनी त्याच्या गावी जाऊन त्याला अटक केली होती. पालघर न्यायालयाने वैद्यक्ीय अधिकारी एम. एस. शिंदे, रिंकूची शेजारची मैत्रीण यांची न्यायालयापुढील महत्वपूर्ण साक्ष व सरकारी वकिल अॅड. परवेझ पटेल यांनी सादर केलेले पुरावे ग्राह्यधरीत न्यायाधिश एम. एस. क्षीरसागर यांनी आरोपी पिंकु यास जन्मठेप व पाचशे रू. चा दंड ठोठावला. खुन करून पुरावा नष्ट केला म्हणून एक वर्ष कारावास अशी शिक्षा गुरूवार दि. १० सप्टेंबर रोजी सुनावल्याचे सरकारी वकील पटेल यांनी सांगितले. (वार्ताहर)
पत्नीच्या खुन्याला जन्मठेप
By admin | Updated: September 14, 2015 23:01 IST