नालासोपारा : अर्नाळा खोल समुद्रात गेले काही दिवस रात्रीच्या अंधारात हौशी मासेमारीच्या नावाखाली मुुंबई, कल्याण, भिवंडी येथील काही मंडळी जात असून भल्या पहाटे परतत आहेत. यामुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.परप्रांतीय हायस्पीड व पर्ससीन मच्छिमारी नौकांची कोकण समुद्रकिना-यावरील घुसखोरी सुरू असतांना त्यात आता ही भर पडली आहे. हे हौशी अनोळखी लोक एका विशिष्ट समाजाचे आहेत. रात्री आठ वाजल्यानंतर चारचाकी वाहनांतून पंधरा ते वीस तर कधी पन्नासच्या संख्येने अर्नाळा समुद्रकिनारी येत असतात.तेथील स्थानिक मच्छीमार बोटी समुद्रात नांगरलेल्या असतात. तिथपर्यंत हे लोक छोट्या होडीतून जाऊन आपल्याकडील रस्सी, मच्छिमार बोटींना बांधून रबरी ट्यूबवर बसून मासेमारीसाठी करीत असतात.ते आपल्यासोबत रबरी ट्यूब, रस्सी, बर्फाचे बॉक्स, तसेच मासे पकडण्यासाठी मोठे गळ घेऊन येत असतात. पहाटे तीन वाजेपर्यंत समुद्रात मासेमारी केल्यानंतर ते निघून जात असतात. हा प्रकार गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असून सुरवातीला दोन-चारच्या संख्येने येणारे आता पन्नासच्या घोळक्याने येऊन मासेमारी करू लागल्याने स्थानिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.याबाबत अर्नाळा सागरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक सुनिल माने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वेगळीच माहिती दिली.अर्नाळा सागरी क्षेत्रात मुंबई व इतर परिसरातील मच्छीमार घुसखोरी करत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्यानंतरआंम्ही चौकशी केली असता ते मच्छीमारच असून अर्नाळा सागरी परिसरात मासेमारीसाठी येत असल्याचे समजले आहे. त्यांची ओळखपत्र व इतर कागदपत्रे आंम्ही तपासून शहानिशा केली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र हा विषय समुद्राच्या आतमध्ये घुसखोरी करणाऱ्या मच्छीमारांबाबत नसून, किनाºयावरून छोटी होडी घेऊन मध्यरात्री खोलवर हौशी मासेमारीसाठी जाणाºयांबाबतचा असल्याचे सांगितल्यावर त्यांनी याबाबत अधिक माहिती देणेटाळले.मुंबईला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर सागरी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. गेल्यावर्षी नव्याने अर्नाळा समुद्रकिनारी सागरी पोलिस ठाणे बांधण्यात आले आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात हौशी लोक रात्रीच्या अंधारात मासेमारीसाठी अर्नाळ्याला येत असतांना ,अर्नाळा सागरी पोलिस याबाबत साधी चौकशीही करीत नसल्यामुळे त्यांचा गलथान कारभार समोर आला आहे. पंधरा दिवसांपूर्वी याच अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर टाईमबॉम्ब सदृष्य स्फोटक वस्तू सापडल्यामुळे चार तास आर्नाळाकर गॅसवर होते.सुदैवाने ती वस्तू बनावट असून तो खोडसाळपणा केल्याचे निष्पन्न झाले होते. या घटनेचाही पाठपुरावा अर्नाळा पोलिसांना करता आला नाही. लांडगा आला रे आला , या गोष्टीसारखे गाफील राहिल्यास भविष्यात मोठी किंमत मोजावी लागेल, असे स्थानिकांकडून सांगण्यात आले.>अर्नाळा समुद्रात रात्री बाहेरून आलेले मच्छीमार मासेमारी करीत असल्याची तक्र ार जागरूक नागरीकांकडून आल्यानंतर आंम्ही चौकशीचे आदेश दिले होते. स्थानिक मच्छीमारांच्या छोट्या होड्यांचा सहारा घेऊन रबरी टायरच्या आधाराने हौशी मासेमारी करणाºयांचीही चौकशी करण्यात येईल. सागरी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आलेली आहे.-विजयकांत सागर ,अप्पर पोलिस अधीक्षक ,वसई
हे संशयित मच्छीमार कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 03:16 IST