नंडोरे : शेलवली ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या खाणपाडा परिसरात पाण्याचा मुबलक साठा असूनही पाण्याची गैरसोय होत आहे. ग्रामपंचायतीने खाणपाडा वस्ती व बाजूला असलेल्या पाडयास बोअरवेल दिली होती पण ती मधून पाणीच येत नाही व दुसऱ्यात पाणी आहे पण पिण्यायोग्य नाही अशावेळी या रहिवाशांना पाण्यासाठी पाड्याबाहेरच्या बोअरवेलमधून व विहिरीतून पाणी आणावे लागत आहे. शेलवली ग्रामपंचायत हद्दीत एकूण १४ लहान मोठे पाडे आहेत. प्रत्येक पाड्यात ग्रामपंचायतीमार्फत बोअरवेल दिलेली आहे. पण त्यांची पाण्याची पातळी खालावल्यामुळे पाणी कमी येत आहे तसेच काही बोअरवेल्स जीर्ण झाल्या आहेत. ग्रामपंचायतीचे बोअरवेल्सवर संपूर्ण दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे शुद्ध पाणीही उपलब्ध नाही.या ग्रामपंचायत हद्दीत जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी पाणीपुरवठयासाठी टाकली आहे. पण ती संपूर्णत: जीर्ण व नादुरूस्त झाली आहे. ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांचीही दुरावस्था झालेली आहे. या खाचखळग्यांच्या रस्त्याने येथील ग्रामस्थ प्रवास करीत असतात. जवळपास आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्रही नाही. परिणामी दवाखान्यासाठी पालघरला यावे लागते. मुख्य रस्त्यापर्यंत एस.टी. व रिक्षा येतात पुढे पाड्यात जाण्यासाठी पायीच पायपीट करावी लागते. जीव मुठीत घेवून या चिमुरड्या पाणी भरत आहेत. शिक्षणाबरोबर घरकामातही आपला हातभार लावत आहेत. पण ग्रामपंचायत प्रशासन यंत्रणा असताना या सर्व गोष्टी दिसूनही न दिसल्यासारखे का करत आहेत असा सवाल उपस्थित होत आहे. (वार्ताहर)
शेलवलीतील विहिरी, बोअरवेल पडल्या कोरड्याखट्ट
By admin | Updated: April 14, 2016 00:41 IST