वाडा : वाडा हे तालुक्याचे ठिकाण असून या ग्रामपंचायतीच्या पाणीयोजनेचे २४ लाख रु. वीजबिल थकल्याने त्यांचा वीजपुरवठा बंद केल्याने पाणीयोजना गेल्या चार दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे प्रचंड पाणीटंचाई निर्माण झाली असून वाडेकरांनी अंघोळीला रामराम ठोकला आहे.वाडा ही महत्त्वाची ग्रामपंचायत असून या गावाची लोकसंख्या ३० ते ३५ हजारांच्या आसपास आहे. शहराच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या या गावात शास्त्रीनगर, शिवाजीनगर, गणेशनगर, विवेकनगर, विष्णूनगर, सिद्धार्थनगर, पाटीलआळी, अंजनीनगर, शरदनगर, आगरआळी, पिक कॉलनी अशी अनेक नगरे वसलेली आहेत.ग्रामपंचायतीच्या पाणीयोजनेचे वीजबिल थकल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. बैलगाडी, टँकरच्या पाण्याच्या एका पिंपाचे १५० ते २०० रुपये एवढी किंमत मोजून पाणी विकत घ्यावे लागत आहे. ग्रामस्थांमधून या प्रकाराबाबत संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
वाड्यात पाणीबाणी
By admin | Updated: February 2, 2016 01:43 IST