तलासरी : पिण्याच्या पाण्याचा अन्य स्त्रोत नसल्याने आदिवासींना डबक्यातील गढूळ पाण्याचा वापर करावा लागत असल्याने रोगराईची शक्यता आहे. पण, याचे सोयरसुतक अधिकाऱ्यांनाही नाही आणि आदिवासी पुढाऱ्यांनाही. आदिवासी भागाच्या विकासासाठी शासनाकडून करोडो रुपये येतात, परंतु खर्च होऊनही आदिवासी भागातच आदिवासींना मूलभूत सुविधा मिळत नाहीत.तलासरीजवळ असलेल्या डहाणू तालुक्यातील मोडगावातील पारसपाड्यामध्ये ३५ आदिवासी कुटुंबे राहत असून या पाड्याकडे अद्याप प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष गेलेले नाही. त्यामुळे मोडगाव, पारसपाड्यातील आदिवासी अनेक वर्षांपासून मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहेत. मोडगाव हे कुर्झे धरणाजवळ असल्याने कोठेही खड्डा खोदल्यास पाणी लागते. त्यामुळे खड्डे खोदून गावकरी पाण्याची गरज भागवत असले तरी शासनाची पाण्याची कोणतीही योजना मोडगाव, या पाड्यात नाही. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीने बसविलेली एकमेव बोअरिंग वर्षभरापासून बंद आहे. त्याकडेही कोणाचे लक्ष नाही. आतापर्यंत गावकरीच त्याची दुरुस्ती करत आले आहेत.पिण्याचे पाणी नसल्याने गावकऱ्यांना गढूळ पाण्याचा वापर करावा लागतो. परिणामी, ते आजाराने हैराण आहेत. पण, शासनाची पाड्यात आरोग्य सेवा मिळेल तर नशीब. कधीतरी अधिकारी व पुढाऱ्यांना जाग येऊन आपल्या पाड्यात मूलभूत सुविधा येतील, या आशेवर ही आदिवासी कुटुंबे जगत आहेत. (वार्ताहर)राष्ट्रीय ग्रामीण पेयजय योजनेतून चार प्रस्ताव पाठविण्यात आले, परंतु त्यापैकी दोनच मंजूर करण्यात आल्याने मोडगाव, पारसपाड्यातील रोजगार हमीतून दोन विहिरींची कामे हाती घेण्यात येणार आहेत. लाभार्थ्यांनी आपले ७/१२ चे उतारे सादर केल्यास काम सुरू करण्यात येणार आहे.- विजय हांडवा, ग्रामसेविका, मोडगाव ग्रामपंचायत, ता. डहाणूउन्हाळ्यात धरणालगत खड्डा (वहरा) खोदून पाणी आणतो, तर पावसाळ्यात शेतालगत खड्डा खोदून पाण्याची गरज भागवितो. परंतु, पाणी गढूळ असते.- गावातील महिला
आदिवासी पितात डबक्यातील पाणी, रोगराईची शक्यता
By admin | Updated: September 7, 2015 22:44 IST