वसई/पारोळ : वसई तालुक्यातील भालिवली, जांभूळपाडा, नवसई, भाताणे, आडणे, थळ्याचा पाडा, भिनार, हत्तीपाडा इ. आदिवासीबहुल असलेल्या गावांना जोडणाऱ्या भालिवली, भाताणे, आडणे, भिनार हा नवीन तयार करण्यात येणारा मार्ग अपूर्ण राहिल्याने पावसाळ्यात या मार्गावर प्रवास करणे धोक्याचे होणार असून, त्यामुळे या भागातील शालेय विद्यार्थी, चाकरमानी, रुग्ण यांचे मोठे हाल होण्याची शक्यता आहे.भालिवली ते निंबवली या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून होणाऱ्या या मार्गाचे काम सुरू करून दोन वर्षे झाली पण ते अजूनही अपूर्णच आहे. या मार्गावर भालिवली ते भाताणे या दरम्यान मार्गावर डांबरपट्टा न टाकता फक्त मातीचाच भराव केल्याने पावसाळ्यात या मार्गावर चिखल झाल्याने प्रवास करणे धोक्याचे होईल. तसेच अपघातातही वाढ होईल. या भागात माध्यमिक व उच्च शिक्षणाची सोय नसल्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना हा मार्ग तयार झाला नाही तर शिक्षण तरी सोडावे लागेल किंवा बाहेरगावी रहावे लागेल. म्हणून हा मार्ग होणे काळाची गरज बनली असतांनाही प्रशासन का जागे होत नाही. हे या भागातील नागरिकांना पडलेले कोडेच आहे. (वार्ताहर)
वसई - भिनार मार्गाची अवस्था दयनीय
By admin | Updated: June 19, 2016 04:25 IST