मोखाडा, जव्हार : एका ३८ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह रुग्णालयातून जव्हार तालुक्यातील घरी नेण्यासाठी रस्ताच नसल्याने चक्क डोलीतून दाेन किलोमीटर न्यावा लागल्याची संतापजनक घटना शनिवारी घडली.
नारनोली गावचे ३८ वर्षीय महेंद्र जाधव हे रोजगाराकरिता वसई येथे होते. शनिवारी (१३ सप्टेंबर) जव्हार रुग्णालयात उपचारादरम्यान रात्री ९ वाजता त्यांचा मृत्यू झाला. रुग्णवाहिका भुसार पाडा गावापुढे जाऊ न शकल्याने महेंद्र यांचा मृतदेह डोलीतून सुमारे दोन किलोमीटर नेण्यात आला.
कितीदा विनंती तरी दुर्लक्ष
मृत्यूनंतरही एवढी अवहेलना सहन करावी लागते तर डिजिटल इंडियाचा ढोल वाजवून त्याचा उपयोग काय, अशी टीका माजी आमदार सुनील भुसारा यांनी केली. रस्त्याची सुविधा करून देण्याच्या मागणीसाठी अनेक वेळा शासन दरबारी पत्रव्यवहार केला. मात्र, रस्ता झाला नाही.
मृत्यूनंतरही नशिबी डोलीच
मृतदेहासाठीही डोली, जिवंत माणसांनाही डोली, अजून आम्हाला किती दिवस किड्या-मुंग्यांप्रमाणे मरू देणार? असा संतप्त सवाल पिंपळशेत खरोंडा ग्रामपंचायतीचे सरपंच दिनेश जाधव यांनी उपस्थित केला.
चांभारशेतपैकी नारनोली गावात रस्ता नसल्याने मृतदेह डोलीद्वारे घरापर्यंत देण्यात आला, ही बाब समजली. त्यानुसार रस्ता होण्यासाठी संबंधित विभागाला कळविले आहे. लता धोत्रे, तहसीलदार, जव्हार