भार्इंदर : पालिकेने स्थायी समितीला सादर केलेल्या यंदाच्या अंदाजपत्रकात तब्बल १२४ कोटींची वाढ प्रस्तावित केली आहे. एकूण महसूली उत्पन्न निम्मे असतानाही अंदाजपत्रकात केलेली वाढ निरर्थक असल्याचा दावा काँग्रेसचे गटनेते जुबेर इनामदार यांनी केला आहे. पालिकेने २६ फेब्रुवारीला स्थायी समिती सभापती हरिश्चंद्र आमगावकर यांना १ हजार ५३८ कोटींचे व १६ लाखांच्या शिलकीचे अंदाजपत्रक सादर केले होते. गेल्यावेळपेक्षा यंदाच्या अंदापत्रकात १५४ कोटींची वाढ केली आहे. स्थायीने सुद्धा अंदाजपत्रकात १२४ कोटींची वाढ प्रस्तावित केल्याने शिलकीतही ९ कोटींची वाढ झाली आहे. सरकारी अनुदानासह एकूण ४७८ कोटी २७ लाखांचे उत्पन्न असलेल्या या अंदाजपत्रकात मूळ महसूली उत्पन्न ३८५ कोटी ८९ लाख एवढे आहे. त्यातच शहरातील विविध प्रकल्पांसाठी पालिकेने एमआरडीएकडून १२३ कोटींचे कर्ज घेतले आहे. त्यासाठी पालिकेला वार्षिक सुमारे ४० कोटींचा हप्ता भरावा लागतो. शिवाय अन्य ठिकाणाहून घेतल्या जाणाऱ्या कर्जाची रक्कम सुमारे ३०६ कोटी इतकी आहे. पालिकेला हे कर्ज फेडण्यासाठी पर्यायी महसूलाचा विचार करावा लागणार आहे. महसूलात वाढ होण्यासाठी लेखा विभागाने पालिकेच्या काही मालमत्ता भाडे तत्वावर देण्याची सूचना प्रशासनाला केली आहे. तसेच पाच टक्के करवाढही प्रशासनाने प्रस्तावित केली होती. मालमत्ता भाडेतत्वावर देण्याचा निर्णय प्रलंबित असला तरी करवाढीला मात्र सत्ताधाऱ्यांनी बगल दिली आहे. विविध कर्जांसह सरकारी अनुदाने व उत्पन्नांच्या स्त्रोतांमुळे यंदाचे अंदाजपत्रक १ हजार ५३८ कोटींपर्यंत फुगविण्यात आले आहे. त्यातही स्थायीने १२४ कोटींची वाढ प्रस्तावित केली आहे. हे अंदाजपत्रक अंतिम मान्यतेसाठी महासभेपुढे सादर करण्यात येणार आहे.
स्थायीने अर्थसंकल्प १२४ कोटींनी फुगविला
By admin | Updated: March 10, 2016 01:43 IST