मीरा रोड : महापालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या विचारात घेऊन नागरिकांची कामे लवकर व्हावीत, यासाठी राज्यातील पालिका क्षेत्रात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू केले जाणार असल्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. भाईंदर येथे स्वयंचलित संगणकीय वाहनचालक चाचणी केंद्र सुरू करणार असून, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अशी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.
राज्याच्या मोटार वाहन विभागाची १५ प्रादेशिक परिवहन कार्यालये, ३५ उपप्रादेशिक कार्यालये आहेत. पालिका क्षेत्रात वाहनांची संख्याही खूप आहे.
वेळ- पैसा खर्च होतो म्हणून...शिकाऊ वाहन परवाना व नंतर नियमित वाहन परवाना, वाहन परवान्याचे नूतनीकरण, वाहन परवान्यासाठीची चाचणी, यासाठी बहुतांश नागरिकांना परिवहन कार्यालयात जाणे लांब पडते. शिवाय मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई झाली असल्यास वाहन परवाना परत मिळवण्यासाठी, वाहनांची नोंदणी, हस्तांतरण, वाहनांचा क्रमांक मिळवणे, योग्यता प्रमाणपत्र मिळवणे आदी कामांसाठी परिवहन कार्यालयात जावे लागते. यात वेळ व पैसा खर्च होतो. प्रत्येक पालिका क्षेत्रामध्ये एक उपप्रादेशिक कार्यालय सुरू झाल्यावर जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन परिवहन संबंधित कामे करण्याची जनतेला तसदी घ्यावी लागणार नाही. ती सर्व कामे पालिका क्षेत्रामध्ये त्यांना करणे शक्य होणार आहे, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
भाईंदर येथे वाहनचालक चाचणी केंद्र - मीरा-भाईंदर पालिका क्षेत्रात उत्तन येथे महसूल विभागाकडून परिवहन विभागाला हस्तांतरित होणाऱ्या ९७०० चौरस मीटर जागेवर स्वयंचलित संगणकीय वाहन चाचणी केंद्र उभारण्यात येणार असून, त्या जोडीला स्वयंचलित वाहनचालक चाचणी मार्गही उभारला जाणार आहे.
- स्वयंचलित चाचणी केंद्र राज्यभरात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी उभारण्यात येणार असल्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सरनाईक यांनी दिली.