पालघर : पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातील विद्यार्थिनी अर्चना रमेश शिंदे (१८), रा. आंबेडकरनगर (प.) हिच्यावर परीक्षेत कॉपी केल्याचा ठपका ठेवल्याने मंगळवारी (२२ मार्च) रोजी पालघर स्टेशनलगत एक्स्प्रेस ट्रेनखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मात्र आपण कॉपी केली नसल्याचे लिहून ठेवल्याने या प्रकरणी महाविद्यालय व्यवस्थापनाने सत्यशोधन समिती स्थापित केली आहे.पालघरच्या दांडेकर महाविद्यालयात प्रथम वर्ष कला वर्गात शिकणाऱ्या अर्चना शिंदे या विद्यार्थिनीचा २२ मार्च रोजी सकाळी ७.३० ते १० असा राज्यशास्त्राचा पेपर होता. हा पेपर लिहीत असताना अर्चनाजवळ कॉपी असल्याचा संशय सुपरवायझर असलेल्या प्राध्यापकाला आला. त्यांना तपासणीदरम्यान खाली पडलेली एक कॉपी सापडली. परंतु, मी कॉपीमधून काहीही बघून लिहिलेले नसल्याचे अर्चनाचे म्हणणे होते. परंतु, सुपरवायझर आपल्या मतावर ठाम राहत त्यांनी अर्चनाचा पेपर ताब्यात घेतला. त्यामुळे अत्यंत तणावग्रस्त अवस्थेत तिने आपल्या घराचा रस्ता धरला. रस्त्यात चालत असताना आता आपली बदनामी होईल, आपण नापास होऊन आपल्याला घरच्यांची बोलणी मिळतील इ. नाना प्रश्न तिच्या डोक्यात वळवळत होते. त्यामुळे तिच्या घराच्या दिशेने जाणारी तिची पावले रेल्वे ट्रॅकच्या दिशेने वळली. याच वेळी चेन्नईकडून गुजरातच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या संपर्क क्रांती एक्स्प्रेसखाली तिने स्वत:ला झोकून देत आपली जीवनयात्रा संपवली. या अपघाताची माहिती मोटारमनने पालघर स्टेशन मास्टरला दिल्यानंतर पालघर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. या वेळी अर्चनाच्या बॅगमध्ये आत्महत्या करण्यापूर्वी तिने लिहिलेल्या चिठ्ठीत मी पेपरमध्ये काहीच बघून लिहिले नव्हते. परंतु, माझे ऐकले गेले नाही. शेवटी माझे निरपराधित्व सिद्ध करण्यासाठी माझ्यापुढे अन्य पर्याय नव्हता. त्यामुळे मी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत असल्याचे तिने नमूद केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या वेळी आपल्या मुलीने झटपट घेतलेल्या निर्णयामुळे मी खूप व्यथित झाल्याचे वडील रमेश शिंदे यांनी सांगितले. (वार्ताहर)विद्यार्थ्यांचा जबाब घेणार...दांडेकर महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने या प्रकरणी सत्यशोधन समिती स्थपित केली असून परीक्षेदरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. दरम्यान, अर्चनाच्या वर्गात तिची मोठी बहीणही परीक्षेला असल्याने तिच्यासह विद्यार्थ्यांचे जबाब या प्रकरणी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. त्या विद्यार्थिनीला जास्तीतजास्त एटीकेटी लागून तिला पुढल्या वर्षी राज्यशास्त्राचा पेपर देता आला असता. आयुष्यात अनेक संधी येत असतात. अशा वेळी आत्महत्या हा शेवटचा पर्याय ठरू शकत नाही. - डॉ. किरण सावे, उपप्राचार्य, सोनोपंत दांडेकर महाविद्यालय
कॉपी केस झाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या
By admin | Updated: March 25, 2016 00:32 IST