वसई : रेल्वेने कोणतीही पूर्वसूचना न देता, वसईहून अंधेरीला जाणारी लोकल रद्द केल्याने ऐन गर्दीच्या वेळीच प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला. प्रवाशांनी नायगाव रेल्वे स्टेशनमध्ये अर्धा तास रेल रोको आंदोलन केले. या वेळी विरारहून आलेल्या काही लोकलच्या दरवाजाजवळ उभ्या असलेल्या प्रवाशांनाही मारहाण करण्यात आली.वसईहून सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी अंधेरीला जाणारी लोकल पूर्वसूचना न देताच रद्द करण्यात आली. त्यामुळे संतापून प्रवाशांनी ट्रॅकवर ठिय्या आंदोलन सुरू केले. ते तब्बल अर्धा ते पाऊण तास ट्रॅकवर बसून होते. या वेळी प्रवाशांनी रेल्वेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.अचानक आंदोलन सुरू झाल्याने पोलिसांचीही तारांबळ उडाली. रेल्वे पोलीस, आरपीएफ आणि स्थानिक पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढून त्यांना ट्रॅकवरून बाजूला केले. त्यासाठी एक तासाहून अधिक काळ गेला. रेल्वेवरील वाहतूक तासभर ठप्प झाल्याने पश्चिम रेल्वेची सेवा तब्बल तीन तास कोलमडली. त्यामुळे अनेक लोकल गाड्या रद्द कराव्या लागल्या, तर लांब पल्ल्यांच्या गाड्या उशिराने धावत होत्या.दरवाजात उभे असणाºयांना मारहाणदरम्यान, नायगाव रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचा संताप आंदोलनानंतरही काही काळ कायम होता. विरारहून चर्चगेटकडे जाणाºया सर्वच गाड्या भरून येत असतात. दरवाजात उभे असलेले प्रवाशी नायगावकरांना डब्यात चढू देत नाहीत. तो राग प्रवाशांनी शनिवारी काढला. विरारहून आलेल्या लोकलमधील दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांना मारहाण करून, खाली खेचण्याचे प्रकारही घडले. त्यामुळे नायगाव रेल्वे स्टेशनवर काही काळ तणावाचे वातावरण होते.
वसई- अंधेरी लोकल रद्द केल्याने नायगाव रेल्वे स्टेशनमध्ये रेल रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 23:14 IST