जव्हार : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त आयोजिलेल्या सोहळ्यात अनाथांची माय असलेल्या सिंधूताई सपकाळ या प्रमुख वक्त्या असणार आहेत. त्यांचे विचार ऐकण्यासाठी जव्हार तालुक्यातीलच नव्हे तर पालघर जिल्ह्यातील जनता मोठया संख्येने उपस्थित राहणार आहे. जव्हार, मोखाडा, विक्रमगड सारख्या अतिदुर्गम भागातील जनतेने आज पर्यंत सिंधुताईंचे नाव ऐकले होते, पुस्तके, टी.व्ही.,च्या माध्यमातून त्यांच्या कर्तृत्वाबाबत माहिती होती. पण त्यांचे विचार ऐकण्याची संधी गुरुवारी लाभणार आहे.त्यांना ऐकणे ही सुवर्णसंधी असून त्यांचे व्याख्यान प्रेरणादायी असतेच परंतु त्यांचा जीवनातील खडतर प्रवास, त्यांचे अनुभव हे वाचण्यापेक्षा त्यांच्या तोंडून ऐकणे हा एक वेगळाच अनुभव असतो. जव्हार, मोखाडा, विक्रमगड सारख्या भागात अनाथ बालकांचे प्रमाण जरी कमी असले तरी शाळाबाह्य मुले, रोजगारासाठी पालकांचे सतत होणारे स्थलांतर, त्यामुळे होणारी बालकांची परवड ही अनाथ मुलांपेक्षा वेगळी नसते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आई-बाप त्यांना सोडून चार-चार महिने बाहेर असतात. अशा वेळी त्या बालकांना अंगणवाड्या हाच आधार वाटतो. त्यामुळे अशा बालकांसाठी शासनाकडून अथवा स्वयंसेवी संस्थांनी सिंधूताई सारख्या तात्पुरत्या आधार शाळा, निवास व भोजन व्यवस्था केली तर ते सिंधूताईंच्या येण्याचे खऱ्या अर्थाने फलित ठरेल, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.या उत्सव समितीचे सभापती नगरसेवक गणेश रजपूत हे असणार आहेत. या दिवशी विविध स्पर्धांचे देखील आयोजन केले आहे. स. १० वा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास नगराध्यक्ष संदीप वैद्य, सभापती रजपूत, कार्याध्यक्ष राजेंद्र शिरसाठ व उत्सव समिती पुष्पहार अर्पण करेल. स. १०.१५ वा. बुद्धवंदन व सूत्रपठण श्रामनेर जयेश लोखंडे व प्रभाकर बल्लाळ हे करतील. त्या नंतर सिंधूताईंचे व्याख्यान होणार आहे. दु.४ ते रा.१० चित्ररूप भव्य मिरवणूक होणार असल्याची माहिती रजपूत यांनी दिली. या कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, आ. कृष्णा घोडा, आदिवासी सेवा मंडळाचे अध्यक्ष निलेश सांबरे, मा.नगराध्यक्ष दिनेश भट, सामाजिक कार्यकर्ते गोविंद बल्लाळ हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले असल्याचे मुख्यधिकारी व संयोजक वैभव विधाते यांनी सांगितले.
आंबेडकर जयंतीला सिंधूताई प्रमुख वक्त्या
By admin | Updated: April 13, 2016 01:53 IST