कासा : पालघर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीचे मुख्य केंद्र कासा ठरले आहे. दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपचा जोरदार प्रचार येथूनच केला. त्यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रवादी-महाआघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा कासा येथे झाली. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कासा येथे आले. या सभेला डहाणू व तलासरी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्वच उमेदवार उपस्थित होते.एकनाथ शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारने एक सर्वसमावेशक कार्यक्रम आखला आहे. सर्वसामान्यांचे, आदिवासींचे हित लक्षात घेऊन एक महिन्याच्या आत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. या भागात तर दोन लाखांच्या वर कोणीही कर्ज घेतले नसल्याने १०० टक्के कर्ज माफ होईल. तसेच गोरगरीब जनतेला उपाशी राहावे लागू नये म्हणून या सरकारने १० रुपयांत जेवणाची शिवथाळी सुरू केली आहे. सरकार स्थापन झाल्याबरोबर पहिल्यांदा सरकारने आदिवासी विकास विभागाची बैठक घेतली. आदिवासींना न्याय, नीट शिक्षण, काम, धान्य कसे मिळेल याकडे आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे ते म्हणाले. या सभेसाठी पालघरचे खासदार राजेंद्र गावित, संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक, पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा, माजी आमदार अमित घोडा, शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा, जिल्हा प्रमुख राजेश शहा आदी उपस्थित होते.
शिवसेनेने केली शेतकरी कर्जमाफी- एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 01:09 IST