राहुल वाडेकर / विक्रमगडपरंपरागत व्यवसाय, ठरलेली कामाची पद्धत आणि नियमित रोजंदारी हे आयुष्य आहे विक्रमगडमध्ये तंबू ठोकलेल्या मेंढपाळांचे. नगर येथील ही मंडळी मेंढराचा चारा, पाणी व त्यांच्या विक्रीसाठी दरवर्षी ही भटकंती करतात. उन्हातान्हातील ही मेहनत पोटापुरती कमाई मिळवून देत असल्याने त्यांना या पिढीजात व्यवसायातून समाधान मिळत आहे.त्यांच्यापैकी संगिता तके यांनी लोकमतला सांगितले की, पोटापाण्यासाठी एका गावाहून दुसऱ्या गावी मेंढरांच्या कळपासह पूर्ण संसार घेऊन आम्ही फिरत असतो. मिळले त्या मोकळ््या जागेवर राहुटी उभारून राहातो. आताच आम्ही जव्हार येथून आलो असून आता विक्रमगडी मुक्कामी राहून दोन तीन दिवसांनी दुसऱ्या गावी जाणार आहोत. आम्ही विक्रमगड-नागझरी रस्त्यावरील असलेल्या मोकळया जागेवर दरवर्षी या सिझनमध्ये येतो व आठ दहा दिवस येथे मुक्काम करतो़ आमचा फिरण्याचा हंगाम सप्टेंबरपासून सुरु होतो. मेंढ्यांच्या विक्रीतून मिळालेला नफा आमच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. दिसणारा मेंढरांचा कळप सर्वच आमच्या मालकीचा नसतो. त्यातील काही आमचे तर काही गावातील दुसऱ्यांचे पाळण्यासाठी चाऱ्यासाठी आम्ही बरोबर घेतो व त्या मोबदल्यात कमाईचा अर्धा हिस्सा आम्हांस दिला जातो़ येथील मुक्काम संपवून आम्ही मनोर, पालघरला जाणार आहोत.मेंढपाळ असणारे राजेश पोथी म्हणाले की, आमचा हाच व्यवसाय अनेक वर्षापासून सुरू असून तो पिढीजात आहे़ आम्हास कुणाचाही आधार नाही. त्यामुळे शिक्षण नाही फक्त मेंढराचा कळप घेऊन गावोगाही भटकंती करुन रोजगार मिळवतो. दिवसभर उन्हातान्हांत फिरुन चटणी भाकरीपुरती कमाई होते. आम्हांस शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत नाही अशी व्यथा त्यांनी मांडली़ परंतु, आजही गेल्या अनेक वर्षातही ही आमचे कुटुंब स्वावलंबी जीवन जगत आहे़ शेतात मेंढ्या लेंडी खतासाठी बसविण्यातूनही आम्हाला काहीशी प्राप्ती होत असते.
मेंढपाळांचे बिऱ्हाड पाठीवरच
By admin | Updated: February 14, 2017 02:37 IST