कासा : डहाणू तालुक्यातील सूर्या कालव्याची दुरुस्तीच होत नसल्याने कालव्यांतर्गत होणाऱ्या शेतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. जलसंपदा विभागाचे अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. भराडजवळील जलसेतू आठ वर्षांपासून नादुरुस्त आहे. मात्र, एकीकडे लाखोंची कामे केल्याचे दाखवित असताना याकडे दुर्लक्ष होत आहे.डहाणू, पालघर तालुक्यांतील सूर्यानगर, वेती, वरोती, कासा, चारोटी, घोळ, भराड, तवा, पेठ, नानिवली, आंबेदा, सोमटा, बोरोती, चिंचारे, आकेगव्हाण या गावांना सूर्या कालव्यांतर्गत उन्हाळ्यातही भातशेती, भाजीपाला आदी पिके घेतली जातात. परंतु, वेळोवेळी कालव्यांची दुरुस्ती होत नसल्याने शेतीला योग्य पाणीपुरवठा होत नसल्याने भातशेतीचे नुकसान होते.डहाणू तालुक्यातील सूर्या उजवा कालव्यांतर्गत लघू कालव्यातून भराड व पुढील गावांना पाणीपुरवठा करणारा सेतू आठ वर्षांपूर्वी कोसळला होता. त्यामुळे पुढील गावांना पाणीपुरवठा बंद झाला. जलसंपदा विभागाने तत्काळ पाइप टाकून तात्पुरती व्यवस्था करून दिली होती. मात्र, दरवर्षी लाखो रु.ची कालव्याची व दुरुस्तीची कामे कागदोपत्री दाखवत असताना आठ वर्षांपूर्वी कोसळलेल्या जलसेतूची दुरुस्ती मात्र अद्याप झालेली नाही. पाइपांना लोखंडी सळईचा आधार दिला आहे. तर, जलसेतूच्या तुटलेल्या बांधकामालाही लोखंडी खांबाचे टेकू देऊन ठेवले आहेत. आता याची दुरूस्ती कधी होते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. (वार्ताहर)
आठ वर्षांपासून जलसेतू नादुरुस्त
By admin | Updated: October 13, 2015 01:44 IST