तलासरी : रेतीउपशाला महाराष्ट्रात बंदी असल्याने गुजरात राज्यातून शेकडो अवैध रेती भरलेले कंटेनर महाराष्ट्रात प्रवेश करतात. असे शेकडो कंटेनर अवैधरीत्या येत असले तरी यावर नाममात्र कारवाई होताना दिसते. डहाणू तसेच तलासरीच्या तहसीलदारांनी कारवाई करून महामार्गावर अवैध रेती घेऊन जाणारे ७ कंटेनर पकडून सोमवारी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.तलासरी तहसीलदार गणेश सांगळे यांनी महामार्गावरील हॉटेलच्या आश्रयाने उभे असलेले दोन रेतीचे कंटेनर पकडून त्यांच्यावर ७ लाख ७० हजारांची दंडात्मक कारवाई केली, तर डहाणूच्या तहसीलदार कौरथी यांनी दापचरी तपासणी नाक्यावरून जाणारे रेतीचे ५ कंटेनर पकडून त्यांच्यावर सहा ब्रास रेतीचे प्रत्येक कंटेनरला ३ लाख रु. याप्रमाणे दंडात्मक कारवाई केली. जप्त कंटेनर सध्या तलासरी पोलिसांच्या ताब्यात असून दंडाची रक्कम भरल्यावर ते सोडण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.महामार्गावरून दररोज शेकडो अवैध रेतीचे कंटेनर जात असल्याने महामार्गावर दापचरी तपासणी नाका येथे महसूल विभागाने तपासणी पथक द्यावे, अशी मागणी जनतेने केली आहे.प्रत्येक कंटेनरमध्ये ८ ते १० ब्रास रेती वाहतूक होत असताना ६ ब्रासचा दंड आकारला जात असल्याने महसूल विभागाच्या कारवाईबाबत शंका निर्माण होत आहे. (वार्ताहर)
रेतीचे सात कंटेनर पकडले
By admin | Updated: September 29, 2015 01:10 IST