शौकत शेख डहाणू : दारिद्रय रेषेखालील आदिवासी व इतर गोर-गरीबांना मंजूर केलेल्या २४२३ लाभार्थ्यांना घरकुल बांधणीचा दुसरा हप्ता गेले चार महिने मिळालेला नाही. त्याच्या अनुदानाचा पहिला हप्ता दिला. याला चार महिने उलटले तरी या लाभार्थ्यांना दुसरा हप्ता मिळालेला नसल्याने त्यांच्यात कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत, बँक, तसेच पंचायत समिती कार्यालय येथे अनेकदा हेलपाटे मारूनही कुणीच दाद देत नाही.तालुक्यात शासनाने प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, तसेच रमाई आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना २४२३ घरकुले मंजूर केली. त्यासाठी प्रत्येक घरकुल लाभार्थ्यांना एक लाख वीस हजार मंजूर होऊन सुरूवातीला बहुसंख्य लाभार्थ्यांच्या बँक खात्यात तीस हजार रूपये जमा केले. त्यानुसार घरकुलाच्या पायाभरणी होऊन ग्रामसेवकांमार्फत जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर फोटो अपलोड करण्यात आले.दरम्यान डहाणूतील एकूण २४२३ घरकुल लाभार्थ्यांपैकी सुमारे ६०० ते १००० घरकुल धारकांचे राष्टÑीयकृत बँकेत जनधन योजनेचे खाते आहे. या जनधन खात्याची क्षमता ३५ हजारांची असल्याने गोंधळ झाला आहे. बँक प्रशासन जनधन खात्यात एवढी मोठी रक्कम स्वीकारत नसल्याने दारीद्रय रेषेखालील कुटुंबांचे बँकेत हेलपाटे मारून हाल होत आहेत. त्यासाठी पालघर जिल्हा परिषदेने बँकेला पत्र देण्याची गरज आहे. परंतु चार महिने उलटूनही पंचायत समिती तसेच जिल्हा, परिषद ग्रामपंचायत प्रशासन कोणतीच उपाय योजना करीत नसल्याने डहाणूत प्रधानमंत्री घरकुल योजनेचा अत्यंत बोजवारा उडाला आहे.उधारी फेडावी कशी? ही चिंता सतावते आहेअसंख्य लाभार्थ्यांनी व्याजाने तसेच उसनवारीने पैसे आणून घरकुल पूर्ण केले. परंतु चार महिने झाले तरी दुसरा हप्ता मिळत नसल्याने त्यांच्यावर वणवण भटकण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे घरकुलाचा दुसरा हप्ता ६० हजाराचा येणार असल्याने त्यांनी पत्रे, विटा, सिमेंट तसेच इतर बांधकाम साहित्य उधारीने आणले होते. परंतु दुसरा हप्ता न मिळाल्याने त्यांचे पैशाविना हाल होत आहेत.
दुसऱ्या हप्त्यापासून घरकुल लाभार्थी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 05:56 IST