जव्हार : जीर्ण इमारत, कोणतीही दुरूस्ती नाही आणि जिल्हा परिषदेचे दुर्लक्षित कारभार यामुळे जव्हार तालुक्यातील खंबाळा- रोजपाडा ही जि.प.ची शाळा मंगळवारी रात्री पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. या शाळेत पहिली ते चौथी पर्यंतची ४४ विद्यार्थी शिक्षण घेतात. जर ही घटना दिवसा घडली असतीतर मोठी दुर्घटना घडली असती असे शालेय व्यवस्थापन शाळेचे अध्यक्ष येदू रोज यांनी लोकमतला सांगितले.येथील ग्रामस्थांनी शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र साहरे यांना या दुघटनेची बातमी कळविली. रोजपाडा शाळेची शुक्रवारी सकाळी केंद्र प्रमुखांनी पाहणी करून पंचनामा करण्यात आला आहे. जिल्हापरिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे ही इमारत कोसळल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिल्या. खंबाळा रोजपाडा ही जिल्हापरिषदेच्या शाळेची इमारत १९९२-९३ साली बांधली होती. या धोकादायक इमारतीबाबत येथील शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांनी यापूर्वी दुरूस्ती व नवीन इमारत बांधकामासाठी वेळोवळी मागणी केली होती. मात्र जिप प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले होते. (वार्ताहर)दुसऱ्या इमारतीकडे तरी लक्ष द्या!रोजपाडा या जिल्हापरिषद शाळेत दोन इमारती असून एक इमारत कोसळली व दुसरी इमारतही धोकादायक आहे. याकडे तरी शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. जव्हार तालुक्यातील अजूनही ६२ जिल्हापरिषद शाळांच्या इमारती धोकादायक आहेत. त्यामुळे या जिल्हापरिषद शाळांकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. नाहीतर विद्यार्थ्यांच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो.
जव्हारमध्ये शाळेची इमारत कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2015 23:15 IST