वसई : नव्या चलनी नोटा मिळवण्यासाठी वसई विरार परिसरात बँका आणि एटीएमसमोर सकाळपासूनची लोकांनी रांगा लावल्या होत्या. किमान दोन-अडीच तासांच्या प्रतिक्षेनंतर अवघ्या चार हजार रुपये हातात पडत असल्याने वसईकरांची परवड तिसऱ्या दिवशीही सुरु होती. बँकांमध्ये नोटा मिळवण्यासाठी दोन-अडीच तास उन्हात ताटकळत उभे रहावे लागत आहे. शनिवारीही अनेक एटीएम बंद होते. तिसऱ्या दिवशी पोस्ट आॅफिसमधून पैसे दिले जात नव्हते. बँकांमध्ये पुरेशी रोकड येत नसल्याने काही बँकांमध्ये दोन-तीन हजार रुपये देऊन लोकांची समजूत काढण्यात येऊ लागली आहे. दैनंदिन खर्च भागवण्यासाठी किमान चार हजार रुपये मिळावेत यासाठी हजारो लोकांनी रांगा लावल्या होत्या. रविवारी बँका उघड्या ठेवल्या जाणार असल्या तरी सोमवारी बँकांना सुटटी आहे. त्यामुळे शनिवारी लोकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या होत्या. चार हजार रुपयांत निकडीच्या खर्चापलिकडे दुसरे काहीही विकत घेणे शक्य नसल्याने ग्राहकांनी पाठ फिरवल्याने दुकाने ओस पडली होती. गेल्या चार दिवसांपासून धंदा ठप्प झाल्याने दुकानदार हवालदिल झाले आहेत. हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसू लागला आहे. दरम्यान, उन्हात दोन-अडीच तास उभ राहणाऱ्या लोकांना वसईत काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी पाणी वाटप करून त्यांना थोडासा दिलासा दिला आहे. त्याचे सगळ्यांनीच मनापासून स्वागत केले.(प्रतिनिधी)
बँकांत खडखडाट, आठवडेबाजार ओस; एटीएम बंद
By admin | Updated: November 13, 2016 00:30 IST