धाटाव : रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांची विविध कामांच्या नावाखाली होत असलेल्या रस्ताफोडीमुळे सर्वच रस्त्यांची अक्षरश: दुर्दशा झाली आहे. अवघ्या पंधरा ते वीस फूट अंतर सोडून जागोजागही होत असलेल्या या रस्ताफोडी प्रकारामुळे कामगार वर्गाला याचा चांगलाच त्रास सहन करावा लागत असल्याने सर्वच कामगार त्रस्त असून संबंधित प्रशासन व अधिकारीवर्गाबाबत संताप व्यक्त करताना दिसत आहेत. धाटाव एमआयडीसीचा कारभार अनेक समस्यांनी गाजत आहे. त्यातच शून्य नियोजन पद्धतीने सुरु असलेल्या विविध कामांमध्ये शहरातील अंतर्गत रस्ते वारंवार खोदले जात आहेत. याचा त्रास वाहनचालक तसेच नागरिकांना बसतो आहे. रस्त्याचे काम सुरु असताना कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा नसल्याने अनेकदा अपघात होत आहेत. मात्र याचे कोणतेही सोयरसुतक नसून संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अनेक ठिकाणी रस्ते खोदले जात आहेत. रस्त्याच्या दुतर्फा बाजूस खड्डे खोदलेत याचा त्रास कामगारांना आहेच. मात्र खड्ड्यांवर मलमपट्टी केली जात असली तरी काही खड्डे जैसे थेच आहेत.
धाटाव एमआयडीसीतील रस्त्यांची दुर्दशा
By admin | Updated: April 21, 2015 22:32 IST