नंडोरे : मंगळवार सकाळपासून बरसात असलेल्या कोसळाधार पावसाने पालघर पूर्वेकडील डोंगराळ भागातील गावांना फटका बसला आहे. पालघर पूर्वेकडील नंडोरे देवखोप ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या नाल्याच्या पुरामुळे या नाल्यानजीक वसलेल्या बहीपाडा व पिल्हेरपाड्यातील काही घरांमध्ये पाणी जाऊन त्यांचे नुकसान झाल्याचे वृत्त आले असून शेलवली ग्रामपंचायत हद्दीत अंबाडी येथे काही ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरले होते मात्र प्रसंगावधान राखल्यामुळे त्यांचे नुकसान टळले आहे.चहाडे ग्रामपंचायत हद्दीतील सज्जनपाडा येथे ओहळात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी भरल्यामुळे हे पाणी वाट काढत येथील लोकांच्या घरात शिरून मोरेश्वर बसवत,सचिन दळवी, रत्नी खुताडे, माजी सरपंच रंजना वाढाण व सुनील इंगळे यांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरून घरासह घरातील जीवनावश्यक वस्तू व खाण्या पिण्यासाठी भरून ठेवलेल्या जिनसा पावसामुळे ओल्या होऊन नासाडी झाली आहे तर काहींच्या घरातील भांडी, कपाटे, टीव्ही यात पाणी शिरून त्याचेही नुकसान झाल्याची घटना घडल्याचे समोर येत आहे.तसेच सरकारने बांधून दिलेले शौचालयही या पावसात तुटून पडले असल्याची घटना घडली आहे. गावातील लोकांच्या मदतकार्यामुळे येथील घरच्या काही वस्तू वाचल्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे. खडकोली वसरे ग्रामपंचायतीत लोकांच्या घरात पाणी शिरले होते मात्र कोणाचेही नुकसान झाल्याची घटना घडली नाही.दरड कोसळून चिमुरडीचा मृत्यूमंगळवारी झालेल्या मुसळधार पावसादरम्यान वाघोबा खिंडीत रात्रीच्या सुमारास धबधब्याकडील वळणावर असलेल्या डोंगराची दरड रस्त्यावर कोसळली. दरडीत यावेळी येथून प्रवास करणाºया कुटुंबातील एका लहान मुलगी सापडून मृत पावल्याची घटना घडली. दरड कोसळल्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी काही काळ बंद करण्यात आला. प्रशासनाने तात्काळ ही दरड बाजूला सारली व वाहतूक पूर्ववत झाली.
बहीपाडा व पिल्हेरपाड्यात पावसाने पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:40 IST