मुंबई : अंधेरी ते विलेपार्ले स्थानकांदरम्यान लोकल रुळावरून घसरल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेची चौकशी रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून सुरू करण्यात आल्यानंतर चौकशीच्या पहिल्याच दिवशी प्रशासनाच्या कामकाजावर ताशेरे ओढण्यात आले. रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागापासून रेल्वे कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा चौकशीत समावेश होता. अंधेरी ते विलेपार्लेदरम्यान चर्चगेटला जाणाऱ्या जलद लोकलचे सात डबे रुळावरून घसरले. यात सहा प्रवासी जखमी झाले. तब्बल २२ तासांनंतर पश्चिम रेल्वे सुरळीत झाली. या घटनेची रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानुसार १८ सप्टेंबर आणि २२ सप्टेंबर रोजी चौकशी होईल, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली. चौकशीच्या पहिल्या दिवशी रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करण्यात आली. यात रेल्वे व्यवस्थापक, अभियांत्रिकी अधिकारी, ओव्हरहेड वायर कर्मचारी, रेल्वे कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा यात समावेश होता. ही चौकशी करताना देखभाल व दुरुस्तीबरोबरच डबे हटवण्यासाठी लागलेला उशीर याबाबत रेल्वे सुरक्षा आयुक्त सुशील चंद्र यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचप्रमाणे रुळावरून घसरलेल्या डब्यांपैकी एका डब्याचे चाक तुटले होते. याची माहिती रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी घेतली असता, ते चाक २६ जून २0१५ रोजी बसवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तसेच चाकाची उच्च क्षमता चाचणी २९ जून रोजी झाली होती. दर सहा महिन्यांनी ही चाचणी होतानाच चाकात कोणताही बिघाड नसल्याचे समोर आले. त्यामुळे अन्य कारणांचा शोध रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून घेण्यात येत आहे.
रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून ‘परे’ प्रशासनावर ताशेरे
By admin | Updated: September 21, 2015 03:43 IST