वसई : ख्रिस्ती उपवास काळाचे औचित्य साधून ऐतिहासिक वसई किल्ल्यात कोळी युवा एकता मंचच्या वतीने क्रूसच्या वाटेच्या भक्तीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी किल्ल्यातील पोर्तुगिजकालीन सात ख्रिस्त मंदिरांचा इतिहास उलगडून दाखविण्यात आला.पोर्तुगीजकालीन वसईच्या किल्ल्यात सात ख्रिस्त मंदिरे आहेत. सध्या ख्रिस्ती उपवास काळ सुरु आहे. त्यानिमित्ताने किल्ल्यात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी दीडशेहून अधिक भाविक सहभागी झाले होते. क्रूसच्या वाटेची भक्ती भक्तीमय आणि अभ्यासपूर्ण वातावरणात पार पडली. इतिहास अभ्यासक डॉ. श्रीदत्त राऊत यांनी सात ख्रिस्तमंदिराचा ज्ञात-अज्ञात इतिहासाची सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी पोर्तुगीजकालीन ख्रिस्तमंदिरांची छायाचित्रे व पोर्तुगीजकालीन अधिकाऱ्यांची दुर्मिळ छायाचित्रेही दाखवली. ख्रिस्त मंदिरांची सध्याची दुरवस्था दूर करण्यासाठी तरुणांनी श्रमदान करावे. त्यामुळे मंदिरांचे संवर्धन होऊन भावी पिढीला इतिहासाचा वारसा लाभेल, असे आवाहन फादर ज्योएल डिकुन्हा यांनी केले. किल्ल्यातील सेंट जॉन चर्च आणि आॅगस्टीन चर्चेच्या संवर्धनासाठी स्थानिक तरुण आणि किल्ले वसई मोहिम परिवार संयुक्तरित्या श्रमदान मोहिम आयोजित करणार आहेत. सुमधुर प्रार्थना गीते व प्रभू येशूंच्या आठवणींना उजाळा देणारी माहिती असा दुहेरी संगम साधणारा अनोखा कार्यक्रम कोळी एकता मंचाने आयोजित केला होता. समारोपाला प्रमुख धर्मगुरु फा. थॉमस लोपीस व नाजरेथ मानकर तसेच ख्रिस्ती बांधवांसह अनेक समाजबांधव मोठया संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पोर्तुगीजकालीन ख्रिस्त मंदिर इतिहासाला उजाळा
By admin | Updated: March 26, 2017 04:02 IST