पंकज राऊत, बोईसरतारापूर एमआयडीसीमध्ये गुरुवारी (दि. ३) दुपारी एक हल्लेखोर कोयत्याने सपासप वार करून जीवघेणा हल्ला करीत असतानाच घटनास्थळाजवळून जात असलेल्या वसंत कवर व मुकेश तटकरे या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता तत्परता दाखवून हल्लेखोराच्या हातातून कोयता घेऊन हल्लेखोराला पकडल्याने एकाचा जीव वाचवण्यात यश मिळवले. त्याबद्दल, त्या जिगरबाज पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.उत्पाद मेहेर (४१), राहणार नवापूर याने रवी राठोड या बिल्डिंग कंत्राटदाराला घराच्या बांधकामाचे कंत्राट दिले होते. कंत्राटदार राठोड हा बांधत असलेल्या घराच्या कामाचे पैसे मागत होता. परंतु, मेहेर याने घराचे बांधकाम पूर्ण करून दिल्याशिवाय पैसे देणार नाही. या आर्थिक व्यवहारातून उद्भवलेल्या वादाचे रूपांतर जीवघेण्या हल्ल्यात झाले होते.कंत्राटदार राठोड याने संतापून गुरुवारी एमआयडीसीमधील टाटा स्टील कंपनीजवळील गोगटे नाका येथे घरमालक उत्पाद मेहेर याच्या डोक्यावर, हातावर, पाठीवर व पोटावर कोयत्याने सपासप वार केले. हल्ला एवढा गंभीर होता की, पोटावर वार केल्यानंतर पोटातील आतडीही बाहेर येऊन वार केलेल्या सर्व शरीराच्या भागातून रक्तप्रवाह वाहत होता.त्या घटनास्थळाजवळून बोईसर पोलीस स्थानकाचे सहायक फौजदार वसंत कवर व पोलीस नाईक मुकेश तटकरे जात असताना दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवून हल्लेखोराच्या हातून कोयता घेऊन हल्लेखोराला पकडले. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. मेहेर यांचा जीव वाचल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पोलिसांनी वाचवला जीव !
By admin | Updated: March 5, 2016 01:12 IST