वाडा : यावर्षी तालुक्यात मार्च महिन्यापासूनच उन्हाचे जोरदार चटके बसू लागल्याने नदी, नाले, विहिरींनी तळ गाठायला सुरूवात केली. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावपाड्यातील आदिवासींना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून तालुक्यातील वरठा पाडा (नाणे) येथील महिलांना बारमाही पाण्यासाठी नदीपात्रातील खड्ड्यातील पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे येथील सुरेश वरठा यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील आदिवासींनी प्रशासनाला दिला आहे.शासकीय अनास्थेमुळे या भागातील नागरीकांना, पाणी, वीज, रस्ते या सारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. या गावाला लागून बारमाही वाहणारी वैतरणा आहे. मात्र शासकीय अनास्थेमुळे व लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेमुळे येथील गावातील आदिवासींच्या घशाला ५० वर्षापासून कोरड पडली आहे. त्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तर दुसरीकडे निवडणूक आचारसंहितेचे कारण पुढे करून या भागातील पाणी प्रश्नाकडे शासन दुर्लक्ष करीत आहे.या गावातील आदिवासी ग्रामस्थ रमेश वरठा, नामदेव तांडेल, शंकर वरठा, रामदास वरठा, अमृत तांडेल, वासुदेव वरठा, बाळकृष्ण वरठा, परशुराम वरठा यांनी ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार अर्ज विनंत्या केल्या त्यासाठी हेलपाटे मारून देखील या आदिवासींना साधा हातपंप देखील मिळाला नसल्याने ते निराश झाले असून प्रशासनावरचा त्यांचा विश्वास उडाला आहे.
वरठा पाड्यात बारमाही तीव्र पाणीटंचाई
By admin | Updated: April 13, 2016 01:49 IST