पालघर : येथील जिल्हाधिकारी कार्यालय व निवासी संकुलाची उभारणी कोळगावच्या दुग्ध विकास प्रकल्पाच्या जागेवर होणार असून सिडकोकडून हे काम करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्हा पत्रकार संघाला दिली.पालघर जिल्हा निर्मितीला पावणेदोन वर्षाचा कालावधी उलटून गेला असतांनाही अनेक कार्यालयाचा कारभार आजही ठाणे जिल्ह्यातून होतो आहे. या समस्यावर ठोस उपाययोजना व्हावी यासाठी पालघर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रमाकांत पाटील, सरचिटणीस पंकज डी. राऊत, उपाध्यक्ष शाम आटे, नरेंद्र पाटील, राम परमार, आशिष पाटील, हुसेन खान, आरीफ पटेल, संतोष पाटील, सुधाकर काटे, संजय नेवे इ. नी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली.पालघर जिल्ह्यात महसूल व दुग्ध विकास विभागाची हजारो हेक्टर जमीन असून त्यापैकी ४४०.६० हेक्टर जमीन सिडकोला विकसीत करण्यासाठी देण्यात आली आहे. त्यापैकी १०३.६७ हेक्टर जमीनीवर जिल्हा मुख्यालयाचे प्रशासकीय संकुल व निवासी संकुल उभारण्यात येणार असून उर्वरीत ३३८.०३ हेक्टर जमीनीपैकी ११० हेक्टर जमीनीवर सिडको स्वत: निवासी इमारती तसेच १७ हेक्टर जमीनीवर व्यापारी व अन्य ५० हेक्टर जमीनीवर निवासी व व्यापारी उपयोगासाठी वापर करणार आहे. १७ हेक्टर जमीनीवर औद्योगिकरण पट्टा तर ५१ हेक्टर मोकळा भूखंड, व मनोरंजनासाठी, ५१ हेक्टर वाहतूक व दळणवळणासाठी ठेवण्यात येणार आहे.सिडकोने दुग्ध विकास प्रकल्पाच्या जागेसंदर्भात राज्य शासनाला दोन पर्याय दिले होते. त्यातील पहिल्या पर्यायात राज्यशासनाने ८७३.८७ कोटी रू. उपलब्ध करून दिल्यास त्या बदल्यात प्रशासकीय मुख्यालय संकुल, अधिकारी व कर्मचारी निवासस्थाने बांधून देणे व दुसऱ्या पर्यायामध्ये दुग्ध विभाग व महसुल विभागाच्या ४४०.६० हेक्टर जमीन दिल्यास त्यातून १०३.६७ हेक्टर जमीनीवर प्रशासकीय मुख्यालय संकुल व निवास स्थाने उभारून देवून उर्वरीत जागांवर व्यापारी तत्वावर बांधकामे उभारण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
पालघरचे मुख्यालय दुग्धविकासच्या जागेवर
By admin | Updated: April 14, 2016 00:44 IST