मनोर : परतीच्या पावसाने ग्रामीण भागातील भातशेतीचे प्रचंड नुकसान केले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाने आता भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.यंदा पाऊस वेळेवर पडल्याने पालघर जिल्ह्णातील सावरे, ऐंबुर, दुर्वेस, करळगाव, मासवण, धुकटण, तामसई, सावरखंड, कुडे, सातिवली, हलोली, बोट या गावांत भातशेतीचे भरघोस पीक आले. चेंबूर, एरंबी, पाटीलपाडा येथील शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरूवात केली. परंतु अचानक परतीच्या पावसाने भातशेती भिजून गेली. तर डौलाने डोलणारी कणसे वादळी वाऱ्या-पावसाने जमीनदोस्त झाले. त्यामुळे तोंडाशी आलेला घास असा पाण्यात वाहून गेला. त्यामुळे शेतीवर जगणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. शासनाने लवकरात लवकर ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मंजूर करावी अशी मागणी हवालदिल शेतकरी करीत आहेत. (वार्ताहर)
परतीच्या पावसामुळे भातशेतीचे नुकसान
By admin | Updated: October 6, 2015 23:24 IST