बोर्डी : महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून निर्मल सागरतट अभियान राबविण्यात येत आहे. या द्वारे किनारा स्वछता आणि पर्यटन यांची सांगड घालून स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असले तरी होणाऱ्या अपघाताची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जीवरक्षक नेमण्याकडे दुर्लक्ष होते आहे. पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डातर्फे निर्मल सागरतट अभियान हाती घेण्यात आले आहे. डहाणू तालुक्यातील चिंचणी, नरपड, चिखले, घोलवड, बोर्डी आणि तलासरीतील झाई अशा सहा ग्रामपंचायतिची निवड केली आहे. विकासकामासाठी निधीची तरतूद केली आहे. या समितीच्या माध्यमातून किनाऱ्याचे संवर्धन आणि व्यवस्थापन केले जाणार आहे. या विकास निधीचा विनियोग सुनियोजितरीत्या करून स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करणे या मागील मुख्य उद्देश आहे. वर्षभरात राबविलेल्या अभियानाचे मूल्यमापन करून उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या ग्रामपंचायतीला पारितोषिक दिले जाणार आहे. प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सी. जे. लेपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यशाळेत सागरतट व्यवस्थापन कमिटीला मोलाचे मार्गदर्शन केले गेले. (वार्ताहर)
बीचवर जीवरक्षकांची गरज
By admin | Updated: March 23, 2017 01:13 IST