‘नामपाडा’ अडकला लालफितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 11:56 PM2020-03-01T23:56:02+5:302020-03-01T23:56:07+5:30

पाच महसुली गावे व १३ आदिवासीपाड्यांची तहान भागवण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेला शहापूर तालुक्यातील नामपाडा (कुतरकुंड) लघुपाटबंधारे प्रकल्प २०१२ पासून लालफितीत अडकला आहे.

'Nampada' stuck in red light | ‘नामपाडा’ अडकला लालफितीत

‘नामपाडा’ अडकला लालफितीत

Next

वसंत पानसरे 
किन्हवली : किन्हवली विभागातील पाच महसुली गावे व १३ आदिवासीपाड्यांची तहान भागवण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेला शहापूर तालुक्यातील नामपाडा (कुतरकुंड) लघुपाटबंधारे प्रकल्प २०१२ पासून लालफितीत अडकला आहे. निविदा, मुदतवाढ यांची कालमर्यादा संपुष्टात आल्याने हजारो शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे. किंबहुना, प्रत्यक्ष प्रकल्पावर १३ कोटी व पर्यायी वनीकरणासाठी एक कोटींचा चुराडा करूनही या प्रकल्पाचे भविष्य अधांतरीच असल्याचे वास्तव समोर आले आहे.
टाकीपठार परिसरातील सावरोली ग्रुपग्रामपंचायत क्षेत्रात हिवाळा या जंगलपट्ट्यात कुतरकुंड या डोहावर आघाडी सरकारच्या काळात २००५-०६ मध्ये नामपाडा लघुपाटबंधारे प्रकल्प मंजूर झाला होता. त्यावेळी मुख्य धरणाचे मातीचे बांधकाम, सांडवा विमोचक बांधकाम व इतर कामांसाठी सहा कोटी ५१ लाख ८०२ रु पये मंजूर केले होते. या बंधाºयासाठी वनविभागाची ३८.९८ हेक्टर जमीन संपादित करणे आवश्यक होते. या प्रकल्पास १३ मे २००८ रोजी केंद्राच्या वनविभागाने तत्त्वत: मंजुरी दिल्यानंतर २००९ मध्ये कामाला सुरु वात झाली. दरम्यान, वनाची अंतिम मंजुरी घेण्यासाठी वैष्णवी कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीने तत्परता न दाखवल्याने ३५ टक्के काम झाल्यानंतर २०१२ मध्ये वनविभागाने हरकत घेत या प्रकल्पाचे काम थांबवले. दरम्यान, मागील आठ वर्षांत ठेकेदाराने रीतसर प्रक्रि या पूर्ण करून प्रकल्प सुरू करण्यासाठी दुर्लक्ष केल्याने २०१६ मध्ये या प्रकल्पाच्या कामाची निविदा व मुदतवाढ संपुष्टात आली.
नामपाडा प्रकल्पासाठी लागणाºया वनजमिनीच्या बदल्यात विविध भागांतील जमिनी वर्ग करण्यात आल्या. पाच कोटी मोबदलाही देण्यात आला होता. परंतु, २००८ पासून त्याबाबतचा अंतिम अहवाल सादर न केल्याने मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने त्रुटींची पूर्तता करण्याचे आदेश दिले होते.
वनविभागाने लघुपाटबंधारे विभागाला पर्यायी वनीकरणासाठी २०१८ मध्ये ७७ लाख ८८ हजार १८८ रु पये अधिकची रक्कम भरण्याचे आदेश देत मार्च २०१९ पर्यंत त्रुटींची पूर्तता करण्यास मुभा दिली होती. मात्र, त्यानंतरही त्रुटींची पूर्तता न केल्याने २०१९ मध्ये २१ लाख २२ हजार व २०२० मध्ये पुन्हा २४ लाख रु पये भरण्याचे आदेश दिले.
या प्रकल्पावर आतापर्यंत १३ कोटी चार लाख खर्च झाले असून केंद्रीय वनविभागाची मान्यता न घेतल्याने नामपाडा प्रकल्प ठप्प झाला आहे. दरम्यान, ठेकेदारास काळ्या यादीत टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली.
।या गावांमध्ये पाणीटंचाई
प्रकल्पाअभावी सावरोली, कानडी, नांदगाव, खरिवली, आपटे या महसुली गावांसह बेलकडी, गांगणवाडी, वडाचीवाडी, हिरव्याचीवाडी, नामपाडा, टाकीचीवाडी, मधलीवाडी, रिकामवाडी, उंबरवाडी, डोंगरी, कातकरीवाडी या आदिवासीपाड्यांत टंचाई जाणवत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.

Web Title: 'Nampada' stuck in red light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.